सातारा उदयनराजेंना सोडला तर शिर्डी, सोलापूर ‘रिपाइं’ला द्या - अशोक गायकवाड
By नितीन काळेल | Published: March 16, 2024 01:12 PM2024-03-16T13:12:28+5:302024-03-16T13:12:49+5:30
..तर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात लढू
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्याचा कारभार चालतो. पण, उमेदवारीत त्यांच्याच सातारच्या गादीचा अवमान झाला आहे. जर खासदार उदयनराजे भोसले यांना सातारची उमेदवारी दिलीतर ‘रिपाइं’ला सोलापूर आणि शिर्डी मतदारसंघ सोडावा. कारण महायुती आमच्यामुळे झाली असून सत्ता कशी बदलायची हेही आम्हाला माहीत आहे, असा इशारा ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहातील आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी आण्णा वायदंडे, आप्पा तुपे यांच्यासह ‘रिपाइं’चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळे युतीची महायुती झाली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत देशात आणि राज्यातही सत्ता प्राप्त झाली. लोकसभा निवडणुकीत सातारची जागा महायुतीतील ‘रिपाइं’ला देण्यात आली. पण, गद्दारी झाली. तरीही आम्ही शांत आहे. आता २०२४ ची निवडणूक असलीतरी आम्हाला महायुतीतून बाहेर पडल्यासारखे वाटत आहे. तसेच उमेदवारीत सातारच्या गादीचा तसेच ‘रिपाइं’चाही अपमान झालेला आहे. त्यामुळे मागे हटायचं नाही, तर नेटाने लढायचं असं ठरवलंय.
तरीही अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे संबंधितांनी सुधारणा करावी. कारण, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आमची एक लाखतरी मते आहेत. ही मते मिळाली नाहीतर भाजप ४०० जागांचा आकडाही पार करणार नाही. प्रसंगी आम्ही राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात लढू. याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊन आम्हाला सन्मान द्यावा, अशी आमची मागणी आहे.