चचेगाव परिसरात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:22+5:302021-06-26T04:26:22+5:30
कऱ्हाड : चचेगाव, ता. कऱ्हाड परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. भरदिवसाही काही शेतकऱ्यांना त्याचे दर्शन होत आहे. परिसरातील काही ...
कऱ्हाड : चचेगाव, ता. कऱ्हाड परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. भरदिवसाही काही शेतकऱ्यांना त्याचे दर्शन होत आहे. परिसरातील काही श्वानांचाही त्याने फडशा पडला असून, परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. गत काही महिन्यांपासून सुपने, काले, नारायणवाडी, आटके, चचेगाव, वहागाव, तळबीड परिसरात बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन महिन्यांपूर्वी वनवासमाची परिसरात दोन बछड्यांचा वावर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यापूर्वी आगाशिव डोंगर परिसरातील धोंडेवाडी, जखिणवाडी, तसेच मलकापूर परिसरात बिबट्याने हल्ला करत शेळ्या तसेच मोकाट श्वान फस्त केले आहेत. सध्या चचेगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आर्थिक मदतीपासून व्यावसायिक वंचित
कऱ्हाड : गुहाघर-विजापूर महामार्गावरील ओगलेवाडी येथील बाजार चौकातील व्यावसायिकांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. छोट्या व्यावसायिकांना शासनाची दीड हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप मिळाली नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओगलेवाडी येथील बाजार चौकात भेळ, वडापाव, पाणीपुरी, इडली सांबर, चायनीज फूड, उसाचा रस, मसाला दूध, फळे आदींची विक्री करणारे सुमारे पंधरा व्यावसायिक आहेत. त्यांना लॉकडाऊनला तोंड द्यावे लागले आहे. सध्या व्यवसायच बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
कऱ्हाड : येथील अंतर्गत पेठांमधील चौकात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील रस्त्याकडेला कचरा टाकत असून, त्यातून ढीग साचत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. पालिकेने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे. पालिकेची घंटागाडी सकाळी व संध्याकाळी अंतर्गत पेठांमध्ये पाठविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
कोळे विभागात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला
कुसूर : कोळे, ता. कऱ्हाड परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या मोकाट श्वानांनी परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांत अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.