माणसे कमी, कामाचा व्याप जास्त; जात पडताळणी होतेय सावकाश...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:36 AM2021-02-12T04:36:30+5:302021-02-12T04:36:30+5:30
सातारा : जिल्हा जातपडताळणी समितीकडे दररोज २०० पर्यंत प्रस्ताव सादर होत असले, तरी मनुष्यबळ कमी असल्याने निकाली काढण्यास काहीसा ...
सातारा : जिल्हा जातपडताळणी समितीकडे दररोज २०० पर्यंत प्रस्ताव सादर होत असले, तरी मनुष्यबळ कमी असल्याने निकाली काढण्यास काहीसा विलंब होत आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे; तर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सर्वाधिक असतात.
साताऱ्यात डिसेंबर २०१६ पासून जिल्हा जातपडताळणी समितीचे कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाचा व्याप मोठा असला तरी तेवढ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नाही. मागील काही महिने कोरोनामुळे जातपडताळणीचे प्रस्ताव रखडले होते. मात्र, सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून प्रस्ताव मोठ्या संख्येने येऊ लागलेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
कर्मचारी संख्या कमी असल्याने जातपडताळणीस विलंब होतो. या कार्यालयातून अत्यावश्यक प्रस्ताव असल्यास आठ दिवसांत निर्णय घेण्यात येतो; तर नियमाने तीन महिन्यांत, तर अपवादात्मक स्थितीत पाच महिन्यांत प्रस्तावावर निर्णय होतो. तीन सदस्यांच्या बैठकीत जातपडताळणीवर निर्णय घेण्यात येतो. या कार्यालयात शासनाचे नियमतत कर्मचारी आहेत. त्याचबरोबर कंत्राटीही काही कर्मचारी कार्यरत आहेत. तरीही कामे पूर्ण करण्यासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
चौकट :
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे...
रोज दाखल होणारी प्रकरणे ५० ते २००
एका महिन्यात दाखल प्रकरणे सरासरी २५००
महिन्यात निकाली निघणारी प्रकरणे सरासरी १०००
प्रलंबित असणारी प्रकरणे ११००
..........
समितीकडील मनुष्यबळ...
समितीकडे ३ अधिकाऱ्यांची पदे आहेत. यामधील एक नियमित असून, दोघांवर अतिरिक्त पदभार आहे, तर शासन नियमित उच्चश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक व शिपाई पद आहे. यामधील कनिष्ठ लिपिक पद रिक्त आहे. त्याचबरोबर कंत्राटी नऊ पदे असून, एक रिक्त आहे.
....................
प्रकरणे निकाली काढण्यासाठी समितीची बैठक
सातारा कार्यालयात जातपडताळणीसाठी दाखल प्रकरणे निकाली काढण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची बैठक होते. यामध्ये सर्वांच्या सहमतीने निर्णय घेण्यात येतो. महिन्यात सरासरी एक हजार प्रकरणांवर निर्णय होतो.
या कार्यालयात विद्यार्थी आणि आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांच्या जातपडताळणीवर निर्णय घेण्यात येतो. आलेल्या प्रस्तावावर नियमाने तीन महिन्यांत, तर अपवादात्मक स्थितीत पाच महिन्यांत निर्णय घेण्यात येतो.
.............................
प्रस्तावावर निर्णय घेण्यास वेळ लागतो...
जिल्हा जातपडताळणी समितीत प्रस्ताव देऊन अनेक दिवस झाले आहेत. मात्र, त्यावर दोन महिन्यांपासून निर्णय झालेला नाही. प्रस्ताव दिल्यानंतर महिन्याच्या आत तरी त्यावर निर्णय होणे महत्त्वाचे वाटते. त्यासाठी शासनस्तरावरुन विचार व्हावा. तरच जात पडताळणी लवकर होईल.
- आकाश जाधव
..............................
व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव समिती कार्यालयात सादर करावा. काही विलंबाने व अपूर्ण प्रस्ताव सादर होतात. वारंवार पत्रव्यवहार करूनही त्रुटींची पूर्तता होत नाही. त्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहतात. तसेच विहित वेळेत जातवैधता प्रमाणपत्र अर्जदारास मिळत नाही.
- स्वाती इथापे, उपायुक्त, जिल्हा जातपडताळणी समिती
..............................................................