विजयाचा गुलाल अंगावर घेऊन पर्यावरण रक्षणाचा धडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:07 AM2021-02-05T09:07:16+5:302021-02-05T09:07:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेट्री : विजयाचा गुलाल अंगावर पडला की अनेकजण हवेत जातात. आपल्या भोवताली काय चाललंय याचंही भान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : विजयाचा गुलाल अंगावर पडला की अनेकजण हवेत जातात. आपल्या भोवताली काय चाललंय याचंही भान राहत नाही. पण मनात हळवा कोपरा असणारीही काही मंडळी असतात. अनावळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या अमोल जाधव यांच्या अंगावरचा विजयी गुलाल निघालाही नव्हता. ते गावाकडे जाताना गणेशखिंडीत वणवा लागल्याचे लक्षात आले. क्षणात ते सहकाऱ्यांना घेऊन वणवा विझविण्यासाठी धावून गेले.
शहराच्या पश्चिमेकडील सातारा-कास मार्गावर गणेशखिंड पठार परिसरात परळीकडील दिशेला विघ्नसंतुष्ट प्रवृत्ती असणाऱ्यांकडून वणवा लावण्यात आला होता. यामुळे परिसरातील कित्येक टन चारा नष्ट होऊन वाऱ्याच्या वेगामुळे मोठ्या प्रमाणावर आग भडकतानाचे चित्र दिसून येत होते. दरम्यान, सातारा येथून निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल ऐकून अनावळेकडे आल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले अमोल नामदेव जाधव यांनी विजयाचा गुलाल अंगावर घेऊन वणवा विझवला.
पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावर असणारा हा परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची कुरणं आहेत. अशा या परिसराला विघ्नसंतुष्टांची नजर लागली आहे. वणवे लावून गवतांच्या कुरणांची राख करण्यात ही मंडळी धन्यता मानताना दिसत आहेत.
यवतेश्वर, कास, बामणोली या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने शेतीबरोबर पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. येथील संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने उदरनिर्वाहासाठी शेतकरी जनावरे सांभाळताना दिसतात. जनावरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकरी गवत कापणी करून त्याच्या पेंढ्या तयार करून गंजी लावतात. मात्र सध्या या परिसरात ठिकठिकाणी वारंवार वणवे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
गणेशखिंड परिसरात गेल्या आठवड्यात लागलेला वणवा झाडांच्या डहाळ्याच्या साह्याने विझविण्यासाठी अनावळे-पेट्रीचे निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव व त्यांचे मित्र सहकारी मंगेश माने, गणेश माने, संतोष माने, दिलीप माने, सुहास माने, संतोष भोसले, अजय खामकर, तुषार माने, सागर माने, अजित माने, दत्ता माने, शशी माने, सूरज माने,गणेश पांडुरंग माने यांनी आटोकाट प्रयत्न केले. वणव्यावर नियंत्रण राखून संभाव्य अधिक हानी टळून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यास मदत केल्याने सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.
पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत
कित्येक वन्यजीवांचा बळी जात असून पशुपक्ष्यांच्या निवाऱ्यांना धोका निर्माण होतो. या वणव्यांमुळे येथील वनसंपदा धोक्यात येऊ लागली आहे. काही अतिउत्साही पर्यटकांकडून वणवा लावला गेल्याने यवतेश्वर-कास मार्गावर गणेशखिंड पठार परिसरात कित्येक टन चारा जळून खाक झाला आहे. अशा बेजबाबदार वृत्तीला आवर घालण्याची मागणी होत आहे. आमच्या मित्रांकडून वेळीच वणवा रोखला गेल्याने संभाव्य पर्यावरणाची हानी टळली, याचे समाधान आहे, अशा भावना नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव यांनी व्यक्त केल्या.
फोटो
२९पेट्री-वणवा
सातारा-कास मार्गावरील गणेश खिंडीत लागलेला वणवा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव यांनी मित्रांच्या मदतीने विजविला.