सातारा : जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वळवाचा पाऊस होत असून विजांचा कडकडाटही सुरू झाला आहे. त्यामुळे विजा कोसळू लागल्या आहेत. मागील दोन महिन्यात जिल्ह्यात विजा पडून दोघांचा मृत्यू तर ९ जनावरेही ठार झाली आहेत. तसेच झाडांवरही वीज कोसळली आहे. यामुळे सध्याच्या काळात वीजा कडाडत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस होतो. याच काळात मेघगर्जना होते. तसेच आकाशात विजाही चमकतात. त्यामुळे अनेकवेळा वीज जमिनीवरही पडते. यामध्ये लोकांचा तसेच पशुधनाचाही जीव जातो. तर मे महिन्यात वळवाचा पाऊस होत असताना नुकसानच अधिक घडते. कारण, जोरदार वारे सुटते. तसेच विजा कोसळण्याचे प्रमाण अधिक राहते. त्यामुळे जीवीतहानीही अधिक होते. त्यामुळे मे ते जून दरम्यानच्या काळाततरी विजांपासून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते.
सातारा जिल्ह्याचा विचार करता मागील दोन महिन्यात वीज कोसळून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. ३० मार्च रोजी जावळी तालुक्यात ३४ वर्षीय शेतकऱ्याचा वीज अंगावर पडून मृत्यू झालेला. संबंधित शेतकरी शेतात ज्वारी काढत होता. तर चार दिवसांपूर्वी फलटण तालुक्यात वीज कोसळल्याने तरुण ठार झाला. संबंधित तरुण इलेक्ट्रीक दुचाकीवरुन दोघा मित्रांसोबत जात होता. त्याचबरोबर वाई तालुक्यातील किकली येथे वीज पडून एक गाय ठार झाली होती. तर सातारा तालुक्यातील सांडवली येथे वीज कोसळून चार गायी आणि एक बैल ठार झाला. ही सर्व जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली होती. नुकतीच ही घटना घडली आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्यात माण तालुक्यात विजेच्या आवाजाने तीन जनावरे मृत झाली होती. आता येथून पुढेही वीजा कोसळण्याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह पशुधनाचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
अशी मिळते मदत...- वीज कोसळून व्यक्तीचा मृत्यू झाल्यास चार लाख रुपये
- मोठ्या मृत जनावरांसाठी ३० हजार रुपये- मृत शेळी-मेंढीसाठी ४ हजार रुपये
- व्यक्ती जखमी झाल्यासही मदतीची तरतूद आहे.