औंध : गोपूज येथील पश्चिम बाजूला असणाऱ्या डोंगरावर गुरुवारी दुपारी वणवा लागला. तो वणवा डोंगरावरून हळूहळू खाली येऊन शेतकऱ्यांच्या शेतात आल्यानंतर, तीस गुंठे उसाचे क्षेत्र व वैरणीचे काही प्रमाणात नुकसान झाले. अज्ञाताने लावलेल्या आगीचे ग्रामस्थांच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
गुरुवारी दुपारी अचानक डोंगरावरून वणवा वेगाने खाली आल्यानंतर ग्रीन पॉवर शुगर्सची मळी प्लांटला येऊन धडकला. मळीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेथून आजूबाजूला असणाऱ्या अनिल घार्गे, महादेव जाधव यांच्या शेतात असणारी काही वैरण आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, तर हणमंत जाधव यांच्या शेतातील तीस गुंठे उसाचेही नुकसान झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील युवक, ग्रामस्थ यांनी चार वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेचा पंचनामा करण्याची मागणी होत आहे.
फोटो:०२औंध
गोपूज येथे गुरुवारी वणवा लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. (छाया-रशिद शेख)