महाबळेश्वर येथे अडीच लाखांचा दारू साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 05:31 PM2019-09-27T17:31:04+5:302019-09-27T17:32:08+5:30
महाबळेश्वरपासून दहा किमी अंतरावर चिखली गावाच्या हद्दीत असलेल्या एका आलिशान रॉकफोर्ड या रिसॉर्टमधील एका पत्र्याच्या शेडमधून देशी विदेशी दारूचा सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा गोव्यातून आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, ही कारवाई गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास करण्यात आली.
महाबळेश्वर : महाबळेश्वरपासून दहा किमी अंतरावर चिखली गावाच्या हद्दीत असलेल्या एका आलिशान रॉकफोर्ड या रिसॉर्टमधील एका पत्र्याच्या शेडमधून देशी विदेशी दारूचा सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा गोव्यातून आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, ही कारवाई गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, रॉकफोर्ड या रिसॉर्टमधील शेडमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. विविध प्रकारच्या कंपनीची देशी-विदेशी दारू या ठिकाणी पोलिसांना आढळून आली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून अवघे दोनच दिवस झाले असताना ही कारवाई करण्यात आल्याने महाबळेश्वर तालुक्यासह या वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर,पाचगणी व वाई पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. दरम्यान, या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापकावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळली होती.