महालक्ष्मी एक्स्प्रेस थांब्यासाठी कोरेगावला हिरवा कंदील

By Admin | Published: March 18, 2015 09:38 PM2015-03-18T21:38:11+5:302015-03-19T00:00:49+5:30

मध्य रेल्वे सकारात्मक : गाडी थांबणार असल्याचे प्रवाशांत आनंद

Mahalaxmi Express for Koregaon Green Lantern | महालक्ष्मी एक्स्प्रेस थांब्यासाठी कोरेगावला हिरवा कंदील

महालक्ष्मी एक्स्प्रेस थांब्यासाठी कोरेगावला हिरवा कंदील

googlenewsNext

कोरेगाव : दुष्काळी खटाव व माण तालुक्यांसह कोरेगाव तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची मध्य रेल्वेची कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस कोरेगाव रेल्वे स्थानकावर थांबण्याचा मार्ग जवळपास मोकळा होत आला आहे. तत्कालीन गृहमंत्री व दिवंगत आर. आर. पाटील यांनी घेतलेल्या परिश्रमाला मध्य रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रवाशांची संख्या आणि रेल्वे गाड्यांची संख्या याबाबतचा अहवाल नुकताच मध्य रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. कोरेगाव ही केवळ सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर दुष्काळी खटाव आणि माण तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या कोरेगाव येथे रेल्वेस्थानक असल्याने तिन्ही तालुक्यांतील प्रवासी कोरेगाव रेल्वे स्थानकाचा सर्वाधिक वापर करतात. केवळ एकेरी मार्ग असल्याने सांगली, कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ प्रचंड आहे. पुणे आणि मुंबईकडे जाण्यासाठी प्रवासी उत्सुक नसतात. महाराष्ट्र, सह्याद्री आणि कोयना एक्स्प्रेस कोरेगाव स्थानकावर थांबतात आणि त्या जिल्ह्यातून प्रवास करत असताना पॅसेंजरच्या धर्तीवर चालत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे वेगवान कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस कोरेगाव रेल्वेस्थानकावर थांबवावी, अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती.
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. आदर्श ग्रामपंचायत धामणेरने त्याबाबत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला होता. पुणे येथील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार केला होता. मध्य रेल्वे व्यवस्थापनाने याबाबत सकारात्मकता दाखवली असून, त्यांनी कोरेगाव रेल्वे स्थानकाच्या संबंधितांशी गेल्या सहा महिन्यांतील मुंबईकडे धावणाऱ्या गाड्यांची संख्या, प्रवाशांची संख्या आणि प्रवासी उत्पन्न याची माहिती मागवली होती. याबाबत सकारात्मक अहवाल पुणे येथे पोहोचला आहे. मध्य रेल्वेला आवश्यक असलेले प्रवासी उत्पन्न मिळत असल्याने आता कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस कोरेगाव रेल्वे स्थानकावर थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)

जनतेमध्ये आनंदाचे वातावरण
कोरेगाव येथून रात्री ११.५५ च्या सुमारास मुंबईला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेसला थांबा मिळणार असल्याने प्रवाशांची व विशेषत: करून व्यापाऱ्यांची चांगली सोय होणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तातडीने महाराष्ट्र दिनापूर्वी हा थांबा कार्यान्वित केल्यास चांगली सोय होणार आहे. सध्या जनतेमध्ये याबाबत आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Mahalaxmi Express for Koregaon Green Lantern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.