वयाचे भान राखतो अन्यथा त्यांची जीभ हासडली असती -। उदयनराजेंचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:51 PM2019-06-15T23:51:49+5:302019-06-15T23:54:54+5:30
नीरा-देवघरच्या पाण्यावरून झालेला साताऱ्यातील वाद आता मुंबईपर्यंत पोहोचला आहे. मुंबई राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रामराजे यांनी ‘साताºयाच्या खासदारांना सांभाळा, नाहीतर आम्हाला मोकळे करा,’ अशी भूमिका मांडली. याचा समाचार घेत उदयनराजे
सातारा : नीरा-देवघरच्या पाण्यावरून झालेला साताऱ्यातील वाद आता मुंबईपर्यंत पोहोचला आहे. मुंबई राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रामराजे यांनी ‘साताºयाच्या खासदारांना सांभाळा, नाहीतर आम्हाला मोकळे करा,’ अशी भूमिका मांडली. याचा समाचार घेत उदयनराजे भोसले यांनी ‘जायचे तर खुशाल जा, कोणी अडविले आहे. पण त्यासाठी आमची ढाल करू नका,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर, ‘वयाने मोठे आहात म्हणून काही बोलाल तर ते खपवून घेणार नाही. वयाचा मान राखतो, अन्यथा जीभ हासडून ठेवली असती,’ असा इशाराही त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये बैठक झाली. या बैठकीत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला. पण, रामराजे यांनी खासदार उदयनराजे यांनी केलेल्या स्वयंघोषित भगीरथ या वक्तव्याबाबत आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्याबाबतच्या उघड मैत्रीचा जाब विचारल्याने उदयनराजे अधिक आक्रमक झाले व बैठकीतून बाहेर पडले.
राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘रामराजे सुसंस्कृत आहेत, विधानपरिषदेचे सभापती आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते वयाने मोठे आहेत म्हणून बोलणार; पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी काहीही बोलावे. त्यांनी चक्रम म्हणावे, पिसाळलेली कुत्री म्हणावे, स्वयंघोषित छत्रपती म्हणावे हे योग्य नाही.
आम्ही स्वत:ला कधीच छत्रपती म्हणत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज होते. छत्रपतींच्या घराण्यात आम्ही जन्माला आलो ही आमची गत जन्मातील पुण्याई असेल; पण आम्ही कधी कोणाचे वाईट पाहिले नाही. वाईटासाठी राजकारण केले नाही. घराण्याच्या नावाचा स्वार्थासाठी फायदा करून घेतला नाही. मी सर्वसामान्य माणूस आहे. सर्वसामान्यांनी मला हृदयात स्थान दिले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मी काम करणार आहे.’
उदयनराजे म्हणाले, ‘मी बोललो तर काय बोललो ? ...मतदार संघातल्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नाचा जाब विचारला. चौदा वर्षांत केवळ पाच किलोमीटर कालवे झाले. खंडाळा तालुक्यातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी माझा प्रयत्न असतो. मी कोणाची बाजू घेत नाही, त्यामुळेच मी कोणाला घाबरत नाही. रामराजेंना एवढा राग यायची गरज काय?, मला दुसºया पक्षात जायचे तर उघड जाईन.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे माझे मित्र आहेत. रामराजे, अजित पवार, शरद पवारांचे इतर पक्षांमध्ये मित्र नाहीत का?, रामराजे आम्हाला चक्रम म्हणतात, आम्ही चक्रम आहे; पण कधी कोणी भ्रष्टाचार केला किंवा चुकीचा प्रकार करत असेल तर मी चक्रम होतो.
रामराजे असे का वागतात ?
संस्कृत सभापती कुपोषित मुलासारखे का वागतात? आम्हालाही खालच्या भाषेत जाऊन उत्तर देता येते. रामराजेंनी जास्त पावसाळे पाहिलेत, त्यांना जास्त ज्ञान आहे, त्यांना आम्ही गुरुस्थानी मानले आहे. पण असे वक्तव्य खपवून घेणार नाही. त्यांना राष्ट्रवादीतून पळवाट काढायची असेल कोणाशी बोलणे झाले असेल तर त्यांनी खुशाल जावे; पण त्याचे खापर माझ्यावर फोडू नये. जो काही निर्णय घ्यायचा तो पवार साहेबांनी घ्यावा.’