सातारा : ‘जिल्ह्यात मागील काही दिवसांत अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून नुकसानभरपाई मिळावी, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समिती सभेत घेण्यात आला, तर यावेळी सभापती मंगेश धुमाळ यांनी बर्ड फ्लूबाबत सतर्कता बाळगावी, अशी सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना केली.
जिल्हा परिषदेची कृषी समितीची सभा सभापती मंगेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रा. शिवाजीराव चव्हाण, प्रकाश चव्हाण, संगीता खबाले-पाटील, सुरेखा जाधव आदी उपस्थित होते. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी फळांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सदस्यांनी पीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याची मागणी केली होती.
सभापती मंगेश धुमाळ म्हणाले, ‘अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आता अवकाळी पावसाने या संकटात आणखी भर पडली. या पीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून मदत द्यावी, असा ठराव या सभेत घेण्यात आला आहे. हा ठराव जिल्हाधिकारी आणि शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
याबाबत जिल्ह्यातील नुकसानीची माहिती घेऊन अहवाल सादर करण्याची सूचना सभापती धुमाळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. या सभेत महावितरणच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या वीज कनेक्शनचा आढावाही घेण्यात आला.
दरम्यान, पशुसंवर्धन समिती सभेत बर्ड फ्लूबाबत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात बर्ड फ्लूसदृश आजार सध्यातरी आढळून आला नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली, तर बर्ड फ्लूचा जिल्ह्यात शिरकाव झाला नसलातरी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना मंगेश धुमाळ यांनी केली.
\\\\\\\\\\\\\\\\\\