फलटण- बारामती रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी आता सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 04:34 PM2022-12-09T16:34:01+5:302022-12-09T16:34:31+5:30
लोणंद- फलटण- बारामती हा ६३ किमीचा रेल्वे मार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा अत्यंत जवळचा व रेल्वेला अतिशय फायदेशीर ठरणारा रेल्वे मार्ग
फलटण : बऱ्याच वर्षांपासून रंगाळलेल्या फलटण ते बारामतीरेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना काहीजण जमीन देण्यास विरोध करत आहेत. या जमिनी सक्तीने संपादन करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्याप्रमाणे बारामती तालुक्यात याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोणंद- फलटण- बारामती हा ६३ किमीचा रेल्वे मार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा अत्यंत जवळचा व रेल्वेला अतिशय फायदेशीर ठरणारा रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग होण्यासाठी दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी १९९८ साली या मार्गाला मंजुरी मिळवली. हा मार्ग रेल्वेच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने तो व्हावा म्हणून रेल्वे विभागसुद्धा प्रयत्नशील आहे.
लोणंद ते फलटण या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होऊन या मार्गावर प्रत्यक्ष रेल्वे सुरू झालेली आहे. मात्र, फलटण ते बारामती रेल्वे मार्गाचे रखडलेले काम नवीन प्लॅननुसार सुरू करण्यात आले. याला बारामती तालुक्यातील लोकप्रतिनिधी व ज्यांच्या जमिनीतून मार्ग जाणार आहे त्यांनीसुद्धा परवानगी दिल्याने फलटण ते बारामती रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
फलटण तालुक्यातील भूसंपादन पूर्ण होत असताना बारामती तालुक्यातील जवळपास ८५ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, काहींनी पुन्हा विरोध सुरू केल्याने सध्या काम थंडावले आहे. या मार्गासाठी आतापर्यंत १३१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. यापैकी संपादन न झालेल्या ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हा प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडे दिल्याची माहिती समोर येत आहे.
या सक्तीच्या संपादनासाठी बारामती प्रांताधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला प्रस्ताव दिला आहे. यासाठी त्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. लवकरच भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावर प्रत्यक्ष लाइन टाकून फलटण ते बारामती रेल्वे सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासन उत्सुक आहे.
फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर या रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम तातडीने मार्गी लागावे, म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतीच रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने गतीने भूसंपादनाचे काम सुरू केले आहे.
१७६ पैकी १२१ हेक्टर जमिनीचे संपादन
रेल्वे मार्गापैकी एकूण ३७.२० किमी रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो. या प्रकल्पासाठी बारामती तालुक्यातील काही गावांमधील खासगी जागा संपादित करण्याची प्रक्रिया पार पडली आहे. या मार्गासाठी १७६ हेक्टरपैकी १२१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे, तर काही दिवसांत ९.६८ हेक्टर एवढ्या जमिनीची खरेदी होईल. त्यामुळे १३१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल. मात्र, बाकी ४० हेक्टर क्षेत्र संपादन करण्यासाठी तेथील नागरिकांकडून विरोध होत असल्यामुळे ही जमीन सक्तीने संपादन करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.