निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांसाठी ‘टू व्होटर ॲप’ सक्तीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:30 AM2021-01-10T04:30:51+5:302021-01-10T04:30:51+5:30
म्हसवड : म्हसवड ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी ‘टू व्होटर ॲप’ डाऊनलोड करणे आणि त्यात माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले ...
म्हसवड : म्हसवड ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी ‘टू व्होटर ॲप’ डाऊनलोड करणे आणि त्यात माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक पारदर्शीपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाने हे आदेश जारी केले आहेत.
उमेदवारांनी माहिती आणि दैनंदिन खर्च या ॲपमध्ये ऑनलाईन दररोज भरावयाचे आहेत. निवडणुकीच्या प्रचारास केवळ सहा दिवस राहिले असताना निवडणूक आयोगाने घातलेल्या बंधनामुळे उमेदवारांना वेळेचे नियोजन करावे लागणार आहे. माण तालुक्यात पहिल्या टप्प्यात ६१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. १५ जानेवारीला ४७ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान होत आहे. ४७ ग्रामपंचायतींमध्ये ३३६ जागांसाठी ७२० उमेदवार उभे आहेत. चौदा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तसेच १९२ उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडील सूचनांनुसार सर्व उमेदवारांनी टू व्होटर ॲप डाऊनलोड करून सर्व निवडणूक खर्च ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. तसेच उमेदवारी खर्च तीस दिवसांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे. खर्च मुदतीत सादर न केल्यास उमेदवार अपात्र होऊ शकतो, अशी माहिती तहसीलदार बी. एस. माने यांनी दिली आहे.