आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंबाला गारपिटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:28 PM2019-04-14T23:28:21+5:302019-04-14T23:28:26+5:30
महाबळेश्वर : महाबळेश्वरसह परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार गारपीट झाली. या गारपिटीचा स्ट्रॉबेरी पिकाला मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे लाखोंचे ...
महाबळेश्वर : महाबळेश्वरसह परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार गारपीट झाली. या गारपिटीचा स्ट्रॉबेरी पिकाला मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. रोपे कुजण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
उन्हाचा कडाका वाढत असताना शनिवारी सायंकाळी महाबळेश्वर तालुक्याला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गारांसह झालेल्या या पावसाचा पर्यटकांसह नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. परंतु स्ट्रॉबेरी पिकाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
भिलार, पाचगणी, मुळेश्वर, माचूतर, लिंगमळा, मेटगुताड, अवकाळी, मेटतळे, वाडा, प्रतापगड या भागात स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लावगड केली जाते.
सध्या स्ट्रॉबेरीचा मुख्य हंगामही सुरू झाला आहे. शेतकºयांना सुगीचे दिवस आले असतानाच अवकाळी पावसाने हाताशी आलेल्या स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाचे पाणी साचून राहिल्याने स्ट्रॉबेरीचे मळे जलमय झाले होते. गारपिटीने स्ट्रॉबेरीच्या फळाची नासधूस झाली. पाण्यामुळे रोपे कुजण्याचा धोका निर्माण झाला असून, शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्ट्रॉबेरीसह तुतीलाही या पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
उत्पादन घटण्याची चिन्हे
स्ट्रॉबेरी पिकाला थंड वातावरण पोषक असते. परंतु यंदा डिसेंबर व जानेवारी महिन्यात अनेकदा दवबिंदू गोठल्याने याचा स्ट्रॉबेरीला फटका बसला. अधिक थंडीमुळे पिके जळाल्याचे शेतकºयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शनिवारी झालेल्या पावसाने फळांमध्ये माती शिरल्याने हातातोंडाशी आलेली फळेही वाया गेली आहेत. रोपेही उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे यंदा स्ट्रॉबेरीचे उत्पादन घटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.