कोपर्डे हवेली : राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक शंकरराव खापे यांनी बनवडीमध्ये विविध शासकीय योजना राबवत विकासकामे केली. अनेक पुरस्कार प्राप्त करून राज्यात नव्हे राज्याबाहेर नावलौकिक मिळवला. ग्रामपंचायत निवडणुकीत शंकरराव खापेंचे वर्चस्व कायम राहील, अशीच भागात चर्चा होती; पण अखेर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. वीस वर्षांनंतर खापे गटाला सत्तेपासून दूर रहावे लागले.
बनवडी ग्रामपंचायतीत शंकरराव खापे यांच्या गटाला साठे गटाने गत वीस वर्षांपासून साथ दिली होती. मात्र, या निवडणुकीत खापे गट आणि साठे गट यांचे मनोमीलन झाले नाही. साठे गटाने खापे गटाशी फारकत घेत पारंपरिक विरोधकांची मोट बांधली. त्यामुळे खापे गटाच्या जनसेवा पॅनलला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. सर्वपक्षीय जनशक्ती पॅनलला दहा, तर राष्ट्रवादी गटाच्या जनसेवा पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
बनवडी कॉलनी विभागावर साठे गटाचा कायमच प्रभाव राहिला आहे. गत वीस वर्षे साठे गट आणि खापे गट एकत्र येऊन सत्तास्थापन करत होते. यामध्ये बनवडी कॉलनीवर साठे गटाचा प्रभाव असल्याने या गटाची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, गत पाच वर्षामध्ये साठे गटातील सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू होता, असा आरोप साठे गटाने केला आहे. याचे शल्य मनात ठेवून सत्ता उलटून लावण्यासाठी सर्व गटतट विसरून सर्वपक्षीय विरोधकांची मोट बांधण्याचे काम साठे गटाचे सर्वेसर्वा शंकरराव साठे यांनी केले. एकमेकांचे हेवेदावे विसरून पारंपरिक विरोधक आणि साठे गट एकत्रित आले. जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भाऊसाहेब घाडगे, विकास करांडे, प्रा. मिलिंद गायकवाड, पांडुरंग कोठावळे, माजी उपसरपंच हरुण नाईक, राजू आतार, अभिजित मोरे, प्रदीप चंदनशिवे यांनी एकत्र येऊन मतदारांसमोर सर्वपक्षीय जनशक्ती पॅनलच्या माध्यमातून प्रचार केला.
विकासकामे केली असल्याने मतदार आपणालाच विजयी करतील, असा गाफीलपणा सत्ताधारी गटाला नडला. त्याचप्रमाणे विकासाचे मॉडेल तयार झाले असले तरी सत्तेच्या सारिपाटातील अंतर्गत धुसफूस सत्ताधाऱ्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.
- चौकट
जनतेला गृहीत धरणे ठरू शकते धोक्याचे...
देश पातळीवर बनवडीचे नाव पोहोचले असताना बनवडीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहील, असे सर्वांना वाटत होते. सत्ताधारीही त्याच भ्रमात होते. मात्र, १८ जानेवारीला बनवडीचा धक्कादायक निकाल ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. जनतेला गृहीत धरून ग्रामपंचायतीचा कारभार करणाऱ्या कारभाऱ्यांना त्यामुळे मोठी चपराक बसली आहे.
- चौकट
सत्ताधाऱ्यांवर विरोधकांचे टीकास्र
जवळच्यांना उमेदवारी देणे, सोयीनुसार केलेली प्रभागरचना, विकासकामात केलेला पक्षपात, एकाधिकारशाहीने केलेला कारभार असे आरोप विरोधकांनी सत्तांधाऱ्यांवर केले. खापे गटाला शह देण्यासाठी साठे कुटुंबाने स्वत:च्या घरातील उमेदवारी मागे घेऊन सागर शिवदास यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. ही त्यागाची भूमिका मतदारांसमोर प्रभावी ठरली. तसेच येत्या पाच वर्षात विकासकामे करताना सर्वांना विश्वासात घेऊन करणार, असा प्रचार केला होता.