मायणी : येथील एका पतपेढीत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा ऊर्फ वैष्णवी अभिजित भगत (वय ३०, रा. मायणी, ता. खटाव, मूळगाव, खानापूर, जि. सांगली) या विवाहित महिलेने घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद तिचा भाऊ सूर्यकांत लाड (रा. पलूस, जि. सांगली) यांनी मायणी पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वर्षा ऊर्फ वैष्णवी भगत या येथील एका पतपेढीमध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होत्या. त्या येथील नवी पेठ भागांमध्ये पतीसोबत राहत होत्या, तर मागील महिन्यात ते तिचे पती अभिजित भगत मागील महिन्यामध्ये आजारी असल्यामुळे खानापूरला राहण्यासाठी गेले होते तेव्हापासून या वर्षा ऊर्फ वैष्णवी भगत एकट्याच राहत होत्या. सोमवारी सकाळी बारा वाजेपर्यंत फोन उचलत नव्हत्या व पतपेढीतील लॉकरच्या चाव्या तिच्याकडे असल्यामुळे पतपेढीतील कर्मचारी राहत्या घरी (नवी पेठ भागांमध्ये) गेल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद होता. आवाज दिल्यानंतरही आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
हा प्रकार वर्षा ऊर्फ वैष्णवीचा भाऊ सूर्यकांत लाड यांना सांगितल्यानंतर ते व त्यांचा भाऊ, इतर भावकीतील लोक मायणी येथे आल्यानंतर घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी वर्षा ऊर्फ वैष्णवी स्वयंपाक खोलीत मृतावस्थेत घटक असल्याचे आढळून आले. या घटनेचा तपास व्हावा, अशी फिर्याद सूर्यकांत लाड यांनी दिली आहे. या घटनेची नोंद मायणी पोलीस दूरक्षेत्रात झाली असून, अधिक तपास पोलीस नाईक बापूराव खांडेकर करत आहेत.