सातारा : कोविडच्या दीड वर्षातील काळात सॅनिटायझर आणि मास्क यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. पण दिवसभर मास्क लावून या भागातील त्वचेवर परिणाम होऊ लागला आहे. श्वासोच्छ्वासामुळे मास्क घातलेला भाग ओलसर राहत असल्याने येथे खाज सुटण्याचे, पुरळ येण्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी घेऊन लोक दवाखान्यात येऊ लागले आहेत.
चौकट :
मास्क आवश्यकच, पण असे करा त्वचेचे रक्षण
मास्क हे स्टाईल स्टेटमेंट नाही, त्यामुळे त्याची स्टाईल नकोच
रस्त्यावर अगदी पाच-सात रुपयांत मिळणारे आकर्षक रंगांचे मास्क टाळा
वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एन ९५ मास्कचा वापर गरजेचा
गुदमरणार नाही आणि तोंड नाक झाकले जाईल असा मास्क तोंडावर लावणे
त्वचाविकाराचे रुग्ण वाढले
कोविडपासून रक्षण करण्यासाठी सुमारे दीड वर्ष घराबाहेर पडताना मास्कचा वापर सक्तीने करण्यात आला. त्यामुळे अनेकांना याचा त्रास झाला. मास्क लावून गाड्यांवरून दौरे करणाऱ्या अनेकांची त्वचा टॅनही झाली आहे. त्यातील बहुतांश जण उपचारासाठी दवाखान्यात येत आहेत.
- डॉ. अण्णासाहेब कदम, त्वचारोगतज्ज्ञ, सातारा
सॅनिटायझरपेक्षा साबण बरे
कोविडच्या आगमनापासून घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझर या दोन्ही वस्तू आता सक्तीच्या झाल्या आहेत. स्वत:चा स्वतंत्र सॅनिटायझर वापरण्याकडे अनेकांचा कल आहे. गेल्या दीड वर्षात गल्लीबोळात तयार होणाऱ्या सॅनिटायझरने अनेकांना त्वचेचे आजार दिले. सॅनिटायझर तयार करण्यासाठी आवश्यक वस्तूंची गुणवत्ता चांगली नसल्याने लोकल सॅनिटायझर त्रासदायक ठरले. त्यामुळे सॅनिटायझरपेक्षा साबण वापरणे अधिक हितावह ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.