सभापती राजाभाऊ शेलार यांना खासदार श्रीनिवास पाटील हे शुक्रवारी पाटण तालुक्यातील पाळेकरवाडी येथे येणार असल्याचे समजताच पंचायत समितीच्या आवारात खासदारांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे त्यांनी नियोजन केले. खासदार श्रीनिवास पाटील त्यासाठी पंचायत समितीत दाखल झाले. त्याचदरम्यान मासिक सभा सुरू होती. सभेत शिक्षण विभागावर चर्चा झाली होती. तेवढ्यात खासदार श्रीनिवास पाटील यांचे आगमन झाले. त्यामुळे दरवेळेपेक्षा मासिक सभेचा नूर पालटला. खासदारांनी आपल्या खास शैलीत सभागृहातील उपस्थित सदस्यांना आघाडी-पिछाडी याबाबत राजकीय मतभेद मनामध्ये न बाळगता खुली चर्चा करूया, असे आवाहन केले. त्यामुळे संपूर्ण सभागृह आणि उपस्थित अधिकारी, सदस्य मोकळेपणाने बोलले.
प्रथमत: सभापती राजाभाऊ शेलार यांनी कऱ्हाड ते चिपळूण या रस्त्याचे चाललेले चौपदरीकरण आणि कोयना विभागातील संगमनगर धक्का ते घाटमाथा यादरम्यान रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत खासदारांना माहिती दिली. त्यासंदर्भात खासदारांनी कंपनीच्या प्रमुखास थेट फोन लावू का, असे विचारले. मात्र, त्याऐवजी येथील स्थानिक बांधकाम अधिकाऱ्यांशी बोलून बघूया, असा पर्याय काढण्यात आला. तालुक्यातील शेतात जाणारे पाणंद रस्ते तयार करण्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारकडून निधी आणण्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी मागणी सदस्य संतोष गिरी यांनी केली, तर रोजगार हमी योजनेतून लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी तालुक्यातील विविध गावांचे पन्नास प्रस्ताव दिलेले आहेत, ते पडून आहेत. तसेच, संपूर्ण ग्रामपंचायतीचे कामकाज पेपरलेस व्हावे, अशी मागणीही यावेळी सदस्य सुरेश पानसकर यांनी केली.
याबाबत खासदारांनी थेट जिल्ह्याच्या रोजगार हमी योजनेच्या महिला अधिकाऱ्यांशी थेट मोबाईलवरून संपर्क साधून पाटण पंचायत समितीच्या सभेतून मी बोलत आहे. आपणाकडे पाटण पंचायत समितीचे सभापती आणि अधिकारी येतील त्यांना रोजगार हमी योजनेसंदर्भातील कामाबाबत मदत करा. कुठे निधी कमी पडला तर मी देईन; पण काम झाले पाहिजे, असे बजावले.
- चौकट
कधीही रात्री-अपरात्री फोन करा!
खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेत नॉनस्टॉप बोलत सर्वांना चकित केले. शेवटी त्यांनी त्यांच्या कार्यालयाचा आणि दोन स्वीय सहायकांचा संपर्क क्रमांक सांगितला. एवढेच नव्हे तर स्वत:चा मोबाईल नंबर सर्वांना सांगितला आणि तुमच्यासाठी केव्हाही मी उपलब्ध असेन. कधीही रात्री-अपरात्री मला फोन करा, असे त्यांनी सांगितले.
- चौकट
महिला स्वच्छतागृह बांधा!
पाटण तालुक्यातील कोणीही आणि कुठेही महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी केल्यास आपण त्यांना तातडीने एका क्षणाचाही विलंब न लावता निधी उपलब्ध करून देऊ, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.
फोटो : ०८केआरडी०६
कॅप्शन : पाटण पंचायत समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेस खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. त्यांनी सदस्यांशी मनमोकळा संवाद साधला. (छाया : अरुण पवार)