एवढे विकासपुरुष आहात, तर पराभव का झाला?; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 10:49 PM2022-07-28T22:49:50+5:302022-07-28T22:50:19+5:30
खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकाद्वारे खरमरीत प्रत्युत्तर दिले.
सातारा : दिल्लीत मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करायचे. शेकडो कोटी निधी आणल्याचे सांगायचे. पण, खरंच किती निधी आणला? आणि एवढे महान विकासपुरुष आहात तर, सातारा लोकसभेला तुमचा पराभव करून जनतेने भरीव विकासाची पोचपावती का दिली? असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला असून दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतः केलेली कुकर्मे लपत नाहीत. उदयनराजेंच्या भ्रष्ट कारभाराचा हिशेब सातारकर नक्कीच करतील. खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकाद्वारे खरमरीत प्रत्युत्तर दिले.
पत्रकात म्हटले आहे की, विकासकामांसाठी पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. तुम्ही १५ वर्षे खासदार होता त्यावेळी कार्यबाहुल्याच्या नावाखाली संसदेत एक दिवसही उपस्थित नव्हता. त्यावेळी का असे फोटोसेशन होत नव्हते. निवडणूक लागली की बरी तुम्हाला केंद्रीय मंत्र्यांची आठवण होते. कास धरणाची उंची आमच्यामुळे वाढली, हे तुम्ही पत्रकातून स्वतः कबूल केले. त्यामुळे याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत. पहिल्यांदा तुम्ही खासदार झाला त्यावेळी रेल्वेतून कऱ्हाडला गेला. आपल्या माहुलीच्या रेल्वे स्टेशनवर मोठा स्टंट केला. पुढे कराड आणि माहुली या दोन्ही स्टेशनचा काय कायापालट केलात? केवळ शोबाजी केली, काहीतरी बदल झाला का? १५ वर्षांत सातारा अथवा कऱ्हाडवरून साधी नवीन, जलद रेल्वे तुम्हाला सुरू करता आली नाही, अशी टीकाही पत्रकात केली आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा उदयनराजेंवर आरोप
सातारा पालिकेला ९५ टक्के निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळाला. केंद्रातून काय मिळालं? साताऱ्याची हद्दवाढ जिल्हा परिषदेत बगलबच्चांसाठी कोणी अडवून ठेवली होती? त्याला राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून मीच घेतली. ज्या बँकेच्या भ्रष्टाचाराची पुंगी सारखी वाजवताय ती बँक कायदेशीररीत्या मर्ज केली. कोणाचा १ रुपयाही बुडवला नाही. तर ज्या अजिंक्यतारा कारखान्याच्याबाबतीत नेहमीच गरळ ओकत असता त्या कारखान्याच्या निवडणुकीला पॅनेल का उभे केले नाही? छाती काढून यायचं होत ना सभासदांच्या पुढं. कोणी अडवलं होतं? तुमच्या पत्रकबाजीने तुम्ही केलेली कुकर्मे लपणार नाहीत. सातारा पालिकेत झालेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पहिला आहे. नशीब, पालिका इमारत नागरिकांच्या मालकीची आहे नाहीतर तीही तुम्ही आणि तुमच्या आघाडीने विकून खाल्ली असती.
मला पण भाऊसाहेब महाराजांचा वारसा आहे. त्यामुळे मला वारशांचं सांगू नका. जनतेची कामे करतो, विकासकामे मार्गी लावतो म्हणून मला जनतेची साथ आहे. तुमचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा आहे. जसे केंद्रात जाऊन निवेदने देताय, तसं एक निवेदन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही द्या आणि स्वतःच्या घरासमोरील रस्त्याचे काम तेवढे मार्गी लावा. शहरातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे, हे तुम्हाला का दिसत नाही. सातारकरांचा किती अंत पाहणार आहात? असा गंभीर प्रश्नही शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला आहे. तुम्ही सातारकरांना कितीही गाजरं दाखवली तरी तुम्ही केलेल्या भ्रष्ट कारभाराचा हिशेब सातारकर लवकरच करतील, असेही शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकात म्हटले आहे.