म्हसवड : ‘नरेंद्र मोदींना चायवाला म्हणून ओळखले जाते. चहाचा अन कपबशीचा तसा जवळचा संबंध आहे. म्हणूनच शेखर गोरेंनी माण-खटाव तालुक्यातील जनतेला चहा पाजावा, ’ असे आवाहन केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी केले.माणचे ‘रासप’चे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवार शेखर गोरे, माजी आ. दिलीप येळगावकर, दिलीप तुपे, किशोर सोनावणे, धीरज दवे, बाळासाहेब खाडे, विजय साखरे, युवराज बनगर, मामूशेठ वीरकर, बबनशेठ वीरकर, उज्ज्वला हाके, सुरेखा पखाले, सोनल गोरे, विलासराव माने, अण्णासाहेब कोळी, नानासो पुजारी, अनिल भोसले उपस्थित होते.यावेळी शेखर गोरे म्हणाले, ‘माणच्या लोकप्रतिनिधींनी गत विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासने गत पाच वर्षांत त्यामधील एकही काम पूर्ण न केल्यामुळे सख्ख्या भावाच्या विरोधात मी निवडणुकीत उभा आहे. पाणी आणले नाही तर राजीनामा देणार, अशा वल्गना केल्या. परंतु पाणी ही आणले नाही अन् राजीनामाही दिला नाही. पाणी आणल्याचे नुसते नाटक सुरू आहे. पाणी आणले, पाणी पूजनावेळी नारळ सोडले ते सध्या खालीपर्यंत गेला नाही. तालुक्यातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे. काहीजणांकडून महिला व विद्यार्थिनींना त्रास दिला जात आहे, यांचा बंदोबस्त केला जाईल. माझ्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागाल, तर पळताभुई करून ठेवीन.’ (प्रतिनिधी)
मोदींचा चहा माण-खटावमध्ये पाजा
By admin | Published: October 12, 2014 12:43 AM