मोट गेली; विद्युत मोटर आली... (संडे स्पेशल)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:33 AM2021-03-14T04:33:54+5:302021-03-14T04:33:54+5:30
भारत कृषिप्रधान देश आहे. देशातील ६० टक्क्यांहून अधिक जनता आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतीक्षेत्रात सतत बदल होत असून, मागील ...
भारत कृषिप्रधान देश आहे. देशातील ६० टक्क्यांहून अधिक जनता आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतीक्षेत्रात सतत बदल होत असून, मागील ३० ते ४० वर्षांचा विचार करता, पिकांना पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारी मोट कायमची बंद होऊन तिची जागा विद्युत मोटरने घेतली. लाकडी औताची जागाही यंत्राने घेतली तर लाकडी बैलगाड्या कमी होऊन लोखंडी उपलब्ध झाल्या. असे अनेक बदल शेतीक्षेत्रात झाले आहेत.
कृषी क्षेत्रात सतत बदल होत आहेत. ४० वर्षांपूर्वीचा काळ आणि आताची स्थिती याचा विचार करता, शेती, शेतकरी आणि उत्पादन यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी पिकांचे ठराविक वाण होते. पण, अलिकडे अनेक नवीन वाणे विकसित झाली आहेत. त्यामुळे छोट्याशा शेतीतही चांगले उत्पन्न घेता येत आहे. ज्वारी, गहू, मिरची असो किंवा ऊस, मका, सोयाबीन या पिकांमध्येही अधिक उत्पन्न मिळू लागलं आहे. पूर्वी मोटेने पिकाला पाणी द्यावं लागायचं. त्यासाठी चामडी मोट असायची. नंतर बदल होऊन पत्र्याची मोट आली. बैलाच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढले जायचे. पण, गेल्या ३० वर्षांत मोट बंद झाली. मोटेची जागा इंजिन आणि आता विद्युत मोटारीने घेतली आहे. विजेच्या सहाय्याने चालणारे हे पंप ३, ५, ७, १० अश्वशक्तीपेक्षाही मोठे असतात. त्यामुळे पाणी प्रेशरने खेचून नेता येते.
पूर्वीच्या काळी मोटेने काढलेले पाणी दंडाने पिकापर्यंत नेण्यात येत होते. त्यासाठी अनेक ठिकाणी वळणे घेत पाणी अर्धा, एक तासाने पोहोचत असे. पण, विद्युत मोटारीबरोबरच पाईप आल्यामुळे शेतकऱ्यांनी दंडाने पाणी न्यायचे बंद करुन पाईपलाईनद्वारे नेण्यास सुरूवात केली. त्यामुळे विजेवरील मोटारीचे बटन दाबले की काही सेकंदातच पाणी ओप्यात पोहोचते. त्यामुळे पाणी फुटून गेले का हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांना कोठे जावे लागत नाही, असे अनेक क्रांतिकारी बदल शेतीत होत गेले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचे कष्टही कमी झाले आहेत.
चौकट :
घायपातचा कासरा कालबाह्य....
शेतीची मशागत करण्यासाठी पूर्वी लाकडी नांगर होते. नांगरणीसाठी त्यांचा वापर होत होता. कालांतराने लोखंडी नांगर आले. हे नांगर वजनाने हलके आहेत तर पेरणीसाठी तिफन होती. तीही लाकडाचा वापर करून बनवलेली असायची. आता मात्र तिफनला लोखंडी नळ्या आहेत. त्यामुळे चाड्यात टाकलेले बियाणे न अडकता जमिनीत पडत आहे. तर बैलाच्या साहाय्याने शेतीची कामे होत. मात्र, ट्रॅक्टर, हार्वेस्टर आल्यापासून बहुतांशी कामे या यंत्रांनीच होत आहेत. खळ्यावर बैलाच्या साहाय्याने मळणी संपली, आता यंत्रांनी मळणी केली जाते. गहू काढण्यासाठीही यंत्र आहे. पूर्वी केकत (घायपात)पासून शेतीसाठी लागणारे दोर, कासरा बनवला जायचा. परंतु, आता सुती, नायलॉनचे दोर उपलब्ध झाले आहेत. कालानुरुप असे अनेक बदल शेतीत झाले आहेत.
.........................................................................