पेट्री : शाळांना सुट्या लागल्या की लहान मुलांना वेध लागतात. मामाच्या गावाला जायचं, खूप मज्जा करायची. पोहायचं, फिरायचं, आंबे, करवंद, फणस, जांभूळ रानमेवा खायचा; परंतु ही अस्सल धमाल अनुभवास मिळते ती म्हणजे ग्रामीण भागातच. परंतु शहरी भागात या सर्व गोष्टींचा आनंद घ्यायचा म्हणजे अवघडच! तरी देखील शहरी भागातील मुलं आपल्या कुटुंबासमवेत या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी कासला एका दिवसाचे नियोजन करताना पाहावयास मिळत आहेत.
दरम्यान, कासला पर्यटकांची प्रामुख्याने पसंती असल्याने बहुसंख्य पर्यटक कास तलावावर पर्यटनांसाठी गर्दी करताना दिसत आहेत. भोजन तयार होईपर्यंत बालचमू आपल्या कुटुंबाकडे तलावावर पोहायला जाण्याचा आग्रह धरत थोरामोठ्या व्यक्तींसोबत दिवसभर पोहण्याचा आनंद घेत आहेत.शहराच्या पश्चिमेला २५ किलोमीटर अंतरावर असलेले कास हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. उन्हाची तीव्रता भासत असल्याने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून पर्यटकांची कास तलावावर गर्दी होऊ लागली आहे. यामुळे या परिसरात आलेल्या बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास तलाव बहरू लागला आहे.
निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी तसेच निसर्गाचे वरदान असलेल्या कास या पर्यटनस्थळी पर्यटकांची सतत वर्दळ असते. कासला मंगळवार, शनिवार, रविवार, सलग सुटीच्या दिवशी तसेच उन्हाळी सुटी असल्याने पर्यटक कुटुंबासमवेत फिरण्यास येत आहे. कास तलावावर दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. पर्यटक कुटुंबासमवेत या परिसरात फिरण्यास येत असून, व्हेज-नॉनव्हेज पार्ट्यांची मेजवाणी लुटण्यासाठी ठिकठिकाणी चुली मांडून हिरव्यागार दाट झाडी झुडपांचा निवारा घेत भोजनाचा आनंद घेताना दिसत आहेत.
कास तलाव म्हणजे जणू काही स्वर्गाची पर्वणीच होय. येथे आल्यानंतर मन शांत, प्रसन्न होते. तसेच उन्हाची दाहकता जास्त असल्याने तलावात पोहण्याचा आनंद वेगळाच मिळतो. परंतु लहान मुलं जलविहाराचा आनंद घेताना कोणतीही एखादी विपरीत घटना घडू नये, यासाठी त्यांच्या पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.- महेंद्र साळुंके, पर्यटक, सातारा