कऱ्हाड : भाड्याच्या घरात राहून मोठ्ठ स्वप्न पाहणारी शकिला ही एका मजुराची लेक़. आई-वडिलांनी मजुरी करून तिच्यासह तिच्या तीन भावंडांना शिकवलं. स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि या स्वप्नांनाच जिद्दीचे पंख देत शकिलाने कुटुंबाच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत घेण्यात आलेल्या पदभरतीत तिची बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (बीएसएफ) निवड झाली.
कऱ्हाड तालुक्यातील कोळे येथील शकिला अमीर शेख ही सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती होणारी मुस्लिम समाजातील जिल्ह्यातील बहुधा पहिलीच युवती. परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले. कोळे येथे भाडेतत्त्वावरील घरात राहणाऱ्या शकिलाचे वडील अमीर व आई मलिका हे दोघेजण शेतमजुरी करतात. त्यांना साबिया, शाहीन आणि शकिला या तीन मुली, तर सोहेल हा मुलगा आहे. शकिला ही बहिणींमध्ये सर्वात धाकटी. शिक्षणातही ती जेमतेम. गावातील घाडगेनाथ विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक, तर कऱ्हाडच्या महिला महाविद्यालयामध्ये तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. गाडगे महाराज महाविद्यालयात २०१८ साली तिने शास्त्र शाखेची पदवी घेतली. एकीकडे पदवीसाठी शिक्षण घेत असतानाच शकिलाला वर्दी खुणावत होती. तिने पोलीस भरतीसाठी प्रयत्न चालविले होते. आजही ती मुंबई पोलीस दलाच्या प्रतीक्षा यादीत आहे.
शास्त्र शाखेची पदवी घेतल्यानंतर शकिलाने स्टाफ सिलेक्शन कमिशनचा अभ्यास सुरू ठेवला. मार्च २०१९ मध्ये तीने त्याची लेखी परीक्षा दिली. त्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर २९ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात आलेल्या शारीरिक पात्रता परीक्षेत आणि २४ ऑक्टोबर २०२० रोजीच्या वैद्यकीय चाचणीतही ती पात्र ठरली. २० जानेवारी २०२१ रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये शेतमजुराची ही लेक निवडली गेल्याचे जाहीर झाले. शकिलाच्या या यशामुळे मजुरी करणाऱ्या तिच्या आई - वडिलांना अक्षरश: गगन ठेंगणे झाले आहे. ‘म्हारी छोरी छोरों से कम है के’ अशीच त्यांची भावना आहे.
- चौकट
फूटपाथवर काढली रात्र
शकिलाला मेडीकलसाठी तेलंगणात हैद्राबादमध्ये जायचे होते. तिच्यासाठी हा प्रवास खडतर होता. कुठून कसं जायचं, इथूनच तिच्या प्रवासाला सुरूवात होणार होती. अखेर मजल दरमजल करीत चाचणीच्या आदल्या रात्री ती हैद्राबादमध्ये पोहोचली. मात्र, कोरोनामुळे तिला तिथे खोली मिळाली नाही. अखेर अवकाळीच्या पावसात रात्रभर फूटपाथवर ती बसून राहिली.
- चौकट
५ किलोमीटर दररोज सराव
परीक्षा फॉर्मची फी आणि प्रवास खर्च एवढ्यातच शकिलाने हे यश मिळवले. घरकाम करून मिळेल त्यावेळेत अभ्यास आणि दररोज कऱ्हाड - ढेबेवाडी मार्गावर पाच किलोमीटर धावणे असा तिचा दिनक्रम होता. त्यातही भाऊ सोहेल याने प्रशिक्षकाची भूमिका बजावली. सरावाला जाताना सोहेल नेहमी तिच्यासोबत असतो.
- कोट
प्रथमपासून मला देशसेवा करण्याची उर्मी व आवड होती. सामान्य परिस्थितीतही आपण यातून मार्ग काढून सीमा सुरक्षा दलात दाखल व्हायचे स्वप्न मी पाहिले होते. ते आज सत्यात उतरले. आता या वर्दीवर स्टार मिळविण्याची जिद्द आहे, आणि ते मी मिळवणारच.
- शकिला शेख
कोळे, ता. कऱ्हाड
फोटो : २९शकिला शेख