अजिंंक्यताऱ्यावर बहरतंय ‘नक्षत्रवन’
By admin | Published: May 31, 2015 10:18 PM2015-05-31T22:18:26+5:302015-06-01T00:15:04+5:30
झाडांनी धरलं बाळसं : धडपड्या वृक्षप्रेमींच्या घामाचं चीज; इतिहासाच्या खांद्यावर खेळतंय परंपरेचं लेकरू! -- गूड न्यूज
राजीव मुळ्ये - सातारा --प्रत्येक नक्षत्राचं एक झाड आणि त्याद्वारे पर्यावरणीय समतोलासह हिरवाईतील वैविध्याची जपणूक. ग्रह-नक्षत्रांच्या प्राचीन अभ्यासकांनी मांडलेली, आयुर्वेदानं संवर्धित केलेली ही संकल्पना ऐतिहासिक अजिंंक्यतारा किल्ल्यावर फलद्रूप होताना दिसते आहे. काही धडपड्या वृक्षप्रेमींच्या प्रयत्नांमधून किल्ल्यावर एक सुंदर ‘नक्षत्रवन’ आता बाळसं धरू लागलंय.
सरकारी यंत्रणेकडून बहुतांश वेळा आॅकेशिया, ग्लिरिशिरिया अशी विदेशी झाडं लावली जातात. ती आपल्या परिस्थितकीला अनुकूल नसल्यामुळं समतोल बिघडवतात. या पार्श्वभूमीवर, अजिंंक्यताऱ्यावर ‘नक्षत्रवन’ साकारण्याचं ‘रानवाटा’ संस्थेने ठरवलं. संस्थेचे सदस्य मोहन साठे यांनी एकसष्ठीनिमित्त दिलेल्या देणगीत भर घालून आर्थिक जुळणी करण्यात आली. परंतु इतकी वैविध्यपूर्ण रोपं एका ठिकाणी उपलब्ध होत नव्हती. अखेर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मलकापूर रोपवाटिकेनं सहा महिन्यांत ऐंशी रोपं उपलब्ध करून दिली. पहिली दोन-तीन वर्षे स्थानिक झाडांची मुलाप्रमाणं काळजी घ्यावी लागते. म्हणून आणतानाच दोन वर्षांपेक्षा जास्त वयाची रोपं निवडण्यात आली. ती किल्ल्याच्या पठारावरील आग्नेयेकडील जागेत वृक्षारोपण सुरू झालं. किल्ल्याचा दरवाजा पश्चिमेकडे असल्यामुळं उंच रोपं त्या ठिकाणी पोहोचवितानाच दमछाक झाली. वृक्षलागवडीनंतर आळी करण्यात आली. गवत वाढू नये म्हणून झाडांकडेला प्लास्टिक कागद अंथरण्यात आले. वाऱ्यानं रोपं मोडू नयेत म्हणून बांबूचे आधार बांधण्यात आले. जवळच एक विहीर आहे. संस्थेचे जयंत देशपांडे, पुरुषोत्तम पाटील आणि विशाल देशपांडे हे तीनच शिलेदार रोज किल्ल्यावर जातात. विहिरीला रहाट नसल्यामुळं पाणी शेंदून ते झाडांना घालतात. प्रत्येक झाडाला एका वेळी वीस ते पंचवीस लिटर पाणी लागत असल्यामुळं तिघांना खूपच परिश्रम घ्यावे लागतात. परंतु वर्ष उलटून गेलं तरी हा शिरस्ता त्यांनी चिकाटीनं कायम ठेवलाय. संस्थेचे डॉ. संदीप श्रोत्री, मिलिंंद हळबे, अॅड. सीमंतिनी नूलकर वारंवार नक्षत्रवनाची पाहणी करून सूचना देतात. लवकरच किल्ल्यावर येणाऱ्या इतिहासप्रेमींना हक्काची गर्द सावली हे नक्षत्रवन देणार आहे.
अशी आहे ‘नक्षत्रवन’ संकल्पना
प्राचीन पंचांगकारांनी प्रत्येक नक्षत्रासाठी एक झाड निश्चित केलं. ज्या नक्षत्रावर व्यक्तीचा जन्म झाला असेल, त्या नक्षत्राच्या झाडाची जोपासना त्या व्यक्तीनं करावी, असं सांगितलं गेलं. त्या झाडाखाली संबंधित व्यक्तीने आराधना करावी, असाही दंडक होता. उदा. कृतिका नक्षत्रासाठी उंबर, भरणीसाठी आवळा, पुनर्वसूसाठी वेळू, पुष्य नक्षत्रासाठी पिंंपळ, धनिष्ठेसाठी शमी, पूर्वा भाद्रपदासाठी आंबा, तर उत्तरा भाद्रपदासाठी कडुलिंंब. अर्थातच पर्यावरणाचा समतोल आणि हिरवाईतील वैविध्य हीच भूमिका यामागे असावी. आयुर्वेदानं या संकल्पनेचा प्रसार केला; कारण नक्षत्रवार सांगितलेली बहुतांश झाडं औषधी आहेत. नक्षत्रांची संख्या २७ असल्यामुळं आपोआपच प्रत्येक व्यक्तीकडून एक झाड म्हणजेच २७ प्रकारच्या स्थानिक झाडांची जोपासना व्हावी, अशी मूळ संकल्पना. ‘रानवाटा’ विकसित करीत असलेल्या नक्षत्रवनात आंबा, जांभूळ, चिंंच, सप्तपर्णी, आपटा, अंजन, बेहडा, बेल, शमी, वड, पळस, अर्जुन, नागकेशर, कळंब, नागचाफा, खैर अशी विविध स्थानिक झाडं लावण्यात आली आहेत.
अनेक हातांची मदत
निसर्गवनात वर्षभरापूर्वी लावलेल्या ऐंशी झाडांपैकी साठ चांगली तरारली आहेत. यंदाच्या पावसाळ्यानंतर जी झाडं जगतील, ती कायम राहतील. अत्यंत परिश्रमपूर्वक हे वन उभारत असताना संस्थेला आपणहोऊन अनेक हातांची मदत झाली. किल्ल्याच्या दरवाजाजवळ रोपे उतरवल्यानंतर पायऱ्या चढून ती मारुती मंदिरापर्यंत नेणं बरंच अवघड होतं. अशा वेळी दररोज सकाळी फिरायला येणारे उदय राठी, अविनाश वांकर, अरुण पाटुकले आणि त्यांच्या ग्रुपनं संस्थेला मदत केली. एका ठेकेदारानं झाडांसाठी तीन फूट लांब, तीन फूट रुंद आणि तीन फूट खोल खड्डे विनामूल्य खणून दिले.