सातारा : ‘सातारा-कोरेगाव रस्त्यालगत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कृष्णानगर येथील सुमारे ०.६५ हे. जागेत जिल्ह्यातील सर्वात मोठे अत्याधुनिक सुविधांनियुक्त नाना-नानी पार्क विकसित करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी दिली. दरम्यान, या नाना-नानी पार्क उद्यानाचे शशिकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती किरण साबळे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य सतीश चव्हाण, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे मुख्य अभियंता एस. डी. गिरी, धोम कालवे विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता वि. जी. चव्हाण, ग्रामविकास पॅनेलचे अध्यक्ष अनिल पवार, दत्तानाना उत्तेकर, सरपंच भीमराव लोखंडे, माजी सरपंच सुजित पवार, विजय श्ािंदे, उषा शिंदे, सुधीर काकडे, दत्ता माने, उपविभागीय अभियंता पिटके यांची प्रमुख उपस्थिती होती.शशिकांत शिंदे म्हणाले, सुमारे सव्वा दोन कोटी रुपये अंदाजित असलेल्या येथील नाना-नानी पार्कमध्ये भव्य लॉन, तंत्रज्ञानाने विकसित केलेली खेळणी, वॉकिंगट्रॅक उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाची २०१४-१५ ची दरसूची वापरून सुमारे ५९ लाख निधी उपलब्ध करून उद्यानाचे काम सुरू करण्यात येत असल्याचे सांगून शशिकांत शिंदे म्हणाले, ‘येथील २० गुंठे जागा खेड ग्रामपंचायतीला विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहे. शहराच्या वैभवात येथील पार्क उद्यानामुळे भर पडणार असून, साताऱ्याची चौपाटी म्हणून हा भाग ओळखला जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कृष्णानगर, संगमनगर, खेड, विकासनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कृष्णानगर येथे साकारणार ‘नाना-नानी पार्क’
By admin | Published: September 10, 2014 10:13 PM