वृक्ष संवर्धन करून निसर्गाची उपासना करावी : जयश्री गिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:25 AM2021-07-08T04:25:30+5:302021-07-08T04:25:30+5:30
कुडाळ : जावली तालुक्यातील नागरिकांनी यावर्षीच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन करत निसर्गाची उपासना करावी, ...
कुडाळ : जावली तालुक्यातील नागरिकांनी यावर्षीच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन करत निसर्गाची उपासना करावी, असे आवाहन जावली पंचायत समितीच्या सभापती जयश्री गिरी यांनी केले.
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, जावली यांच्यातर्फे मोरघर (ता. जावली) येथील डोंगरखिंडीत जयश्री गिरी यांच्या हस्ते वन महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल महांतेश बगले, वनक्षेत्रपाल परदेशी, मोरघर सरपंच रंजना मोरे, वेण्णामाईचे अध्यक्ष सुरेश पार्टे, ग्रामसेवक गायकवाड, ग्रामस्थ, वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
जुलै महिना हा सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन महोत्सव कालावधी म्हणून साजरा केला जातो. या कालावधीत समाजातील सर्व घटकांमार्फत तसेच सर्व शासकीय, निमशासकीय व अशासकीय संस्थांमार्फत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. यावेळी वृक्ष लागवडीमध्ये वड, आंबा, फणस, जांभूळ, आदी प्रजातीच्या उंच रोपांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक तुकाराम लंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल सुनील चव्हाण, वनरक्षक अमर शिंदे, मोहन भिलारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
(चौकट)
कन्या समृद्धी योजना
वन महोत्सव कालावधीत जास्तीत जास्त लोकांना वृक्ष लागवड करता यावी, यासाठी सामाजिक वनीकरणामार्फत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या कालावधीत मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी ‘कन्या वनसमृद्धी योजना’ व्यापक स्वरुपात राबविली जाणार आहे.