होय राष्ट्रवादीच मोठा भाऊ, शासकीय एजन्सीचा वापर करून गलिच्छ राजकारण सुरूच: अनिल देशमुख
By प्रमोद सुकरे | Published: May 22, 2023 07:23 PM2023-05-22T19:23:39+5:302023-05-22T19:24:14+5:30
माजी गृहमंत्री अनिल देशमुख खाजगी दौऱ्यानिमित्त कराडला आले होते.
प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: सध्या विविध शासकीय एजन्सीचा गैरवापर वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यात येत आहे .मलाही खोट्या केस मध्ये अडकवण्यात आलं; माझा छळ करण्यात आला. संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकण्यात आले.मध्यंतरी
हसन मुश्रीफ यांच्या मागे लागले. आता जयंत पाटील यांना त्रास सुरू केला आहे. अशा पद्धतीने गलिच्छ राजकारण केले जात आहे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख खाजगी दौऱ्यानिमित्त कराडला आले होते. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना छेडले. त्यावेळी ते बोलत होते. देशमुख म्हणाले, माझ्यावर तर शंभर कोटींच्या गैरव्यवहार चा आरोप करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष आरोप पत्र दाखल केले तेव्हा त्यात १ कोटी ७२ लाखच नमूद करण्यात आले आहेत. हा केवळ राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर फडणवीसच दूरदृष्टीचे नेते आहेत. असे सदाभाऊ खोत यांचे विधान आहे. त्याकडे लक्ष वेधले असता देशमुख म्हणाले, सदाभाऊ खोत यांचं राजकिय ज्ञान फार कमी दिसते.पवारासारखे दांडगे ज्ञान देशात कोणाचे नाही. ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधीपक्ष पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.त्यावर काय प्रतिसाद मिळतोय ते पहावे लागेल. असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले.
नोटाबंदीने सर्व समाजाला त्रास झाला. २ हजाराची नोटबंदी का झाली याला थातुरमातुर उत्तर दिले जात आहे.कोणत्या अर्थ तज्ञाला विचारून नोट बंदी केली ही माहिती आता पुढे येईल. काही दिवसापूर्वी काँग्रेसचे आमदार जास्त होते. त्यावेळेला ते मोठे भाऊ होते. आता राष्ट्रवादीचे आमदार खासदार मोठ्या संख्येने आहेत .त्यामुळे आता आम्ही मोठे भाऊ आहोत असे सांगत त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. तर विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.