सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री शशिकांत शिंदे हे कोट्यधीश असून, त्यांच्यासह पत्नीकडे ५० कोटींहून अधिक रकमेची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तसेच महागड्या गाड्या आणि शेतजमीनही नावे आहे तर दोघांच्याही नावे सुमारे १५ कोटींचे कर्ज आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. दि. १५ एप्रिल रोजी शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शपथपत्र देण्यात आले. त्यामध्ये संपत्तीचा तसेच इतर उल्लेख करण्यात आलेला आहे. शशिकांत शिंदे यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. त्यांच्याविरोधातील दोन फाैजदारी खटले प्रलंबित आहेत तर त्यांच्याकडे २५ हजार २५० रुपयांची रोख रक्कम हाती आहे तर पत्नी वैशाली शिंदे यांच्याकडे २० हजारांची रोकड आहे.शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नीकडील जंगम मालमत्तेची किंमत १६ कोटी ३८ लाख ३४ हजार ५४८ रुपये इतकी आहे तर स्थावर मालमत्ता दोघांच्याही नावे ३६ कोटी ९२ लाख ३५ हजार २६० रुपयांची आहे. शिंदे यांच्यावर ८ कोटी ४९ लाख रुपयांचे कर्ज आहे. तसेच पत्नीच्या नावेही ७ कोटी ४८ लाख रुपयांचे कर्ज आहे, असे शपथपत्रात स्पष्ट केलेले आहे.
उत्पन्नस्रोत शेती अन् व्यवसायमाजी मंत्री शिंदे यांच्याकडे लाखो रुपयांच्या महागड्या गाड्या आहेत. तसेच सोने-चांदी, जडजवाहिर आहे. शिंदे यांच्यासह पत्नीच्या नावे शेत आणि बिगर शेतजमीनही आहे. याची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. माजी मंत्री शिंदे यांचा उत्पन्नस्रोत हा शेती तसेच व्यवसाय आहे.