खंडाळा : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेला नजरेसमोर ठेवून काम करत आहे. विशेषतः लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पक्षाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. जनसेवा हे एक व्रत म्हणून पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यरत असतात. जनतेची सेवा व मूलभूत कामे करण्यात राष्ट्रवादी पक्ष कधीच कमी पडणार नाही,’ असे प्रतिपादन खंडाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुचेता हाडंबर यांनी केले.
अंदोरी (ता. खंडाळा) येथे आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी, शुगर व हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच प्रदीप होळकर, नानासो ननावरे, दत्तात्रय धायगुडे, सदस्य बाळासो होवाळ, कैलास भिसे, संध्या खुंटे, नर्मदा कोकरे, सोपान धायगुडे, तानाजी ठोंबरे, बुधराणी हॉस्पिटलचे डॉ. साठे, डॉ. अस्मिता लांडगे उपस्थित होते.
महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये १६० गरजू ग्रामस्थांची नेत्र व शुगर तपासणी करण्यात आली. यापैकी सुमारे तीस लोकांच्या डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
...................................................