नीरा-सातारा सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:43 PM2019-08-28T23:43:04+5:302019-08-28T23:43:08+5:30
सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक गतीने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सहापदरीकरणाचा निर्णय झाला. ...
सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक गतीने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सहापदरीकरणाचा निर्णय झाला. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील नीरा नदी ते शेंद्रे या अंतरात सहापदरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याने या मार्गावर वाहतूक सुसाट होताना दिसते, तर शेंद्रेपासून कºहाडपर्यंत अनेक अडथळे पार करत हळूहळू वाहतूक पुढे सरकताना पाहायला मिळते.
देहू रोड ते शेंद्रे या अंतरातील महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले. नीरा ते शेंद्रे या ७२.५०० किलोमीटर अंतरातील काम वेगाने पूर्ण झाले. या मार्गावर मोठ्या गावांच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. हे उड्डाणपूल बांधण्याआधी अनेकांचे जीव वाहनांच्या वेगामुळे गेले. आता मात्र ज्या ठिकाणी वर्दळ जास्त आहे, त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधले गेल्याने रस्ता ओलांडून जाण्याचे प्रकार थांबले. त्यामुळे अपघातही कमी झाले आहेत. खंबाटकी घाटात रस्त्याचे रुंदीकरण केल्याने वाहतूक कोंडी तसेच गंभीर अपघात टळताना दिसतात. या घाटात एका मंदिराच्या ठिकाणी रुंदीकरण तेवढे रखडलेले आहे. तर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बोगद्याच्या पुढे एस वळण असल्याने मोठे अपघात होतात. त्याला पर्याय म्हणून वेळे येथील बोगद्याला समांतर दोन बोगदे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळ्यामुळे हे काम रखडले असले तरी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याने या बोगद्याची कामेही मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, सहापदरीकरणाचे काम शेंद्रेपर्यंत झाले आहे. तिथून कºहाडकडे चारपदरी रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर अनेक अडथळे पार करत वाहने जात आहेत. अनेक मोठ्या गावांच्या ठिकाणी उड्डाणपूल नसल्याने अपघात होत आहेत.
बोगद्याच्या कामाचा मार्ग मोकळा
वेळे येथील बोगद्याच्या कामात वाई व खंडाळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. भूसंपादनाची नोटीस या शेतकºयांना दिली होती. त्यांना जमिनीचा मोबदला दिला जात आहे. त्यामुळे ही भूसंपादनाची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होऊन या बोगद्यांचे काम मार्गी लागणार आहे.
या ठिकाणी हवेत उड्डाणपूल
शेंद्रे ते कºहाड रस्त्यावर नागठाणे, माजगाव, अतीत, इंदोली या गावांच्या ठिकाणी उड्डाणपुलांची गरज आहे. या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊनच महामार्गावर येतात. तसेच महामार्गावरून जाणाºया वाहनधारकांना तर अतिशय जपून वाहने चालवावी लागतात.
वेळेत उड्डाणपुलाची मागणी
या महामार्गावर वेळे, ता. वाई येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वेळेतून कोरेगाव तालुक्यातील गावे तसेच वाई तालुक्याच्या पश्चिमेकडच्या गावांना जाण्यासाठी जोड रस्ते आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसायही असल्याने याठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याची गरज आहे.
टॉयलेट्सची गैरसोय
महामार्गावर टॉयलेटच नसल्याने प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासून गैरसोय सुरू आहे. कायमस्वरुपी शौचालय उभारणे शक्य नसले तरी फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.