मायणीत ना कंटेन्मेंट झोन, ना रुग्णांची माहिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:41 AM2021-04-23T04:41:31+5:302021-04-23T04:41:31+5:30
मायणी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र मायणीमध्ये संबंधित विभागामार्फत कोणतीही ठोस उपाययोजना ...
मायणी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र मायणीमध्ये संबंधित विभागामार्फत कोणतीही ठोस उपाययोजना राबवली जात नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील सात दिवसांमध्ये तब्बल ६७ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.
खटाव तालुक्यातील मायणी येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मात्र, संबंधित विभागामार्फत गावामध्ये कोठेही कंटेन्मेंट झोन जाहीर केला नाही किंवा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती किंवा रुग्ण सापडतो, त्या परिसरात कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत.
गृहविलगीकरण नावाखाली अनेक कोरोनाबाधित व्यक्ती घरातच राहत आहेत. खासगी दवाखान्यात विशेष करून सांगली जिल्ह्यात जाऊन अनेक व्यक्ती कोरोना चाचण्या करून घेत आहेत. मात्र याठिकाणी चाचणी करून जर एखाद्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तो सातारा जिल्हा आरोग्य प्रशासनाला कळत नाही, शेजारी राहणाऱ्यांना कळत नाही व स्थानिक आरोग्य यंत्रणेलाही कळत नसल्याने मोठा धोका निर्माण होत आहे.
खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी केलेले लोक व कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरात सोय आहे म्हणून तेथून निघून येत आहेत. मात्र घरात राहताना योग्य व पुरेशी काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहेे. तसेच ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशा व्यक्तींच्या घरातील इतर सदस्य बिनधास्त बाजारपेठेत इतरत्र फिरत आहेत. तसेच शेजारी असणाऱ्यांनाही योग्य माहिती मिळत नसल्याने परिसरामध्ये कोरोना अधिक वेगाने पसरत आह
त्यामुळे मायणी व मायणी परिसरामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
मायणीमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून आजअखेर सुमारे शंभरहून अधिक व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर मागील सात दिवसांमध्ये तब्बल ६७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी तब्बल १९ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असून, या महिन्यात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
मायणी गावात व उपनगरांत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. मात्र, संबंधित प्रशासनाने पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात, त्या परिसरामध्ये कोठेही कंटेन्मेंट झोन जाहीर केला नाही किंवा त्याठिकाणी कोणतीही पुरेशी काळजी घेतली जाताना दिसत नाही.
(चौकट)
नोंद होत नसल्यानेच कोरोनाचा प्रादुर्भाव...
मायणीशेजारी सांगली जिल्ह्यातील विटा ही मोठी बाजारपेठ असून, या ठिकाणी अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेली खासगी हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी स्थानिक व प्रतिष्ठित व्यक्ती कोरोना चाचण्या करून घेत आहेत. मात्र त्यांची नोंद सातारा जिल्हा प्रशासनाला किंवा स्थानिक आरोग्य यंत्रणेला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
(चौकट)
अहवाल येईपर्यंत बिनधास्त वावर...
कोरोना चाचणी करून घेतलेल्या व्यक्ती अहवाल येईपर्यंत बिनधास्त फिरत आहेत व अहवाल आल्यानंतरही कंटेन्मेंट झोन होत नाही. कोरोना चाचण्या कोणी करून घेतल्या आहेत, परिसरातील व्यक्तींना कोण कोरोना पॉझिटिव्ह आहे, याची माहिती मिळत नाही, त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.