सातारा : लाखो गोरगरिबांचे आधारस्तंभ आणि जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार अलीकडे सातत्याने घडत आहेत. शासकीय रुग्णालय म्हणजे राग व्यक्त करण्याचं ठिकाण समजून अनेक लुंग्या-सुंग्या मवाल्यांची डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे आम्हाला नाही वाली.. कुणी पण होतोय मवाली.. अशी हतबल प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.जिल्हा रुग्णालयात अनेक गोरगरीब रुग्णांवर उपचार केले जातात. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण या ठिकाणी येऊन उपचार घेत असतात. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नेहमी सतर्क राहावे लागते. रात्रंदिवस रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर व कर्मचारी प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत असतात. रुग्णावर उपचार करताना एखाद्याचे बरेवाईट झाले तर पुढे काय होईल, या भीतीनेच अनेक वैद्यकीय अधिकारी हतबल होऊन जातात. प्रत्येक नातेवाइकाला आपल्या रुग्णाच्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली जाते. एवढेच नव्हे तर रुग्णाची प्रकृती गंभीर आहे, याची कल्पना देऊन नातेवाइकाची स्वाक्षरीही घेतली जाते. असे असताना शेवटी प्रयत्न करूनही रुग्ण दगावलाच तर सर्वस्वी तेथील कार्यपद्धतीलाच जबाबदार धरले जाते. त्यानंतर मग रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मारहाणीपर्यंत प्रकार घडत असतात. पूर्वी काही डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने बळी गेल्याच्या घटना घडल्या असल्या तरी आता जे डॉक्टर, कर्मचारी आहेत, हे सगळेच हलगर्जीपणा करतात, असे म्हणणे उचित ठरणार नाही. एखाद्या कर्मचाऱ्यांमुळे सर्व सिव्हिलच वाईट आहे, असा ठपका ठेवून रुग्णाचे नातेवाईक राग व्यक्त करतात, तो कायद्याला किंवा माणुसकीला धरून नाही. यापूर्वी घडलेल्या घटनांमध्ये असेच दिसून आले आहे. सिव्हिल म्हटलं की आपल्या पूर्वजांची संपत्ती असल्यासारखे समजून काहीही केले तरी चालते, अशी भावना समाजात रुजू लागली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मारहाण, शासकीय मालमत्तेचे नुकसानीचे प्रकार घडत आहेत. हल्ली गल्लोगल्ली छोटे-मोठे गुंड, ‘दादा’ तयार होत आहेत. या मवाल्यांकडूनच सिव्हिलच्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरवली जात आहे. अशा मवाल्यांचा कायमचा बीमोड करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून तसाच पोलिसांनाही पाठिंबा द्यावा, एवढीच आमची माफक अपेक्षा असल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)रुग्णालयात तोडफोड करणाऱ्यांकडून भरपाई घ्यावी. शासनाने कठोर कायदे करून शासकीय मालमत्तेचे जतन केले पाहिजे. अशा हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी जामीन मिळवून देऊ नये. विनाकारण नेहमी सिव्हिलला जबाबदार धरले जाते.- विष्णू पाटसुते, सिव्हिल रुग्णालयसिव्हिलमध्ये येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक क्वचितच आमच्याशी चांगले बोलतात. बाहेर भांडणे झाली तरी सिव्हिलमध्ये येऊन तोडफोड केली जाते. काहीवेळा आम्हालाही मारहाण केली जाते. त्यामुळे दहशतीखाली असतो.-अमोल तोरणे, सिव्हिल कर्मचारीचार वर्षांत १४ वेळा हल्ला!‘सिव्हिल’मध्ये आत्तापर्यंत चार वर्षांत तब्बल १४ वेळा हल्ला झाल्याची नोद आहे. वारंवार रुग्णालयात तोडफोड होत असल्यामुळे या ठिकाणी चोवीस तास दोन पोलीस कर्मचारी नेमणुकीस असतात; परंतु अचानक रुग्णाच्या नातेवाइकांकडून हल्ला झाल्यानंतर या दोन पोलिसांना काहीच करता येत नाही. जादा कुमक येईपर्यंत जे व्हायचं ते होतं. त्यामुळे अजून दोन पोलीस कर्मचारी या ठिकाणी नेमावेत, अशी मागणीही कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
नाही वाली...कुणी पण होतोय मवाली!
By admin | Published: July 03, 2015 9:59 PM