सातारा : आतापर्यंत आपण पाळीव श्वानांची चोरी झाली, हे ऐकलं असेल. पण, साताऱ्यात चक्क गाढवांचीच चोरी होत आहे. एका गाढवाची किंमत ४० ते ५० हजार रूपये असल्याने त्यांची विक्री करून पैसे कमावण्याच्या उद्देशाने चोरीचे प्रकार वाढले असून, गाढवं पाळणाऱ्यांना डोळ्यात तेल घालून त्यांची राखण करावी लागत आहे.सातारा शहरासह तालुक्यातील डोंगरी भागात गाढवांच्या साह्यानेच दगड, माती, विटा, वाळू असे साहित्य वाहून नेण्याचे काम केले जाते. त्यामुळे गाढवांचे पालन - पोषण करणारी अनेक कष्टकरी कुटुंब आज जिल्ह्यात स्थिरस्थावर झाली आहेत. उदरनिर्वाहाचा कणा असल्याने ही कुटुंब आपल्या गाढवांना जीवापाड जपतात. मात्र, अलीकडे श्वानांप्रमाणे गाढवांचीही चोरी होऊ लागल्याने या कुटुंबांची अक्षरश: झोप उडाली आहे.गाढवांचा अवजड कामासाठी उपयोग होतो. एक गाढव विकत घ्यायचे म्हटले तरी ४० - ५० हजार रूपये मोजावे लागतात. त्यामुळे काही मंडळी गाढवांवर लक्ष ठेवून असतात. संधी मिळताच गाढव वाहनातून गायब केले जाते. या गाढवांची परजिल्ह्यात विक्री करून पैसे कमविले जातात. एकदा का गाढव चोरीला गेले की, परत मिळण्याची शक्यता धुसर असते, अशी माहिती भुईंज येथील रामचंद्र जाधव यांनी दिली.
भुईंजमध्ये झाला होता चोरीचा प्रकार...वाई तालुक्यातील भुईंज येथे गाढवांची चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. काही अज्ञात व्यक्तींनी चार गाढवं टेम्पोत भरली होती. ही बाब निदर्शनास येतात ग्रामस्थांनी संबंधितांना पोलिस ठाण्याचा रस्ता दाखविला. यानंतर गाढवांच्या चोरीचा प्रकार उघडकीस आला होता.
ज्याप्रमाणे शेतकरी गुरा-ढोरांना चरण्यासाठी घेऊन जातात, त्यांची राखण करतात. त्याचप्रमाणे आम्हालाही गाढवांना चरण्यासाठी घेऊन जावे लागते. त्यांची राखण करावी लागते. कारण ती चोरीला जाण्याची भीती कायमच मनात असते. - रामचंद्र जाधव, भुईंज