कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. कच्ची मतदार यादी प्रसिद्धी, हरकती, सुनावणी हे सगळे सोपस्कार पार पडले आहेत. ६ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे आता कृष्णा कारखाना निवडणूक कार्यक्रमाची उत्सुकता सभासदांच्यात लागून राहिलेली आहे. परिणामी राजकीय वातावरणही तापू लागले आहे.
सातारा, सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याचे ४० हजारांच्या दरम्यान ऊस उत्पादक सभासद आहेत. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीसारखे स्वरूप येते. दोन्ही जिल्ह्यांतील मातब्बर नेत्यांची येथे कसोटी लागते. त्यामुळे निवडणुकीचा वेगळाच माहोल येथे पाहायला मिळतो.
कृष्णा कारखान्यातील विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल सुमारे एक वर्षभरापूर्वी संपला आहे. मात्र, कोरोनाच्या महामारी संकटामुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळत गेली. आजही कोरोनाचे संकट गडदच आहे .मात्र, या कारखान्याचे काही सभासद निवडणूक त्वरित घ्या, या मागणीसाठी न्यायालयात गेले होते. त्यामुळे न्यायालयाच्या सूचनेनुसार निवडणूक प्रकियेला गती प्राप्त झाली आहे.
सध्या कारखान्यात डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलची सत्ता आहे. भोसलेंच्याकडे बहुमत आहे, तर संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांच्यासह काही संचालक विरोधी बाकावर सभागृहात आहेत.
सत्ताधारी डाॅ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहे; पण त्याचबरोबर माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल या निवडणुकीसाठी जोरदार तयारीत आहे. शिवाय रयत पॅनेलचे प्रमुख, माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरविण्याची तयारी केली आहे.
गत वर्षभर कोरोनामुळे कृष्णा कारखान्याची निवडणूक पुढे पुढे सरकत गेली आहे. साहजिकच त्यामुळे सभासदांच्यातही निवडणुकीसंदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. गत महिन्यात मात्र कारखान्याच्या सभासदांची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली. त्यानंतर आता निवडणूक होणार याची चाहूल सभासदांना लागली. त्यावर हरकती घेण्यात आल्या, त्याची सुनावणी झाली, सुनावणीचा निकालही लागला. आता ६ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे साहजिकच सभासदांना निवडणुकीचे वेध लागले आहेत.
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो. तो कार्यक्रम कधी जाहीर होणार, अर्ज दाखल करण्याची तारीख काय, छाननी कधी होणार, माघार घेण्याची मुदत काय असणार, मतदान किती तारखेला होणार, मतमोजणी व निकाल कधी लागणार, या साऱ्यांबाबत कृष्णेच्या सभासदांच्यात मोठी उत्सुकता आहे.
कोट
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर दहा दिवसांच्या नंतर व वीस दिवसांच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागतो. कृष्णा कारखान्याची अंतिम मतदार यादी ६ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर नियमानुसार कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
धनंजय डोईफोडे
प्रादेशिक सहसंचालक
साखर संघ पुणे
फोटो
कृष्णा सहकारी साखर कारखाना संग्रहित फोटो