सातारा : जिल्ह्यामध्ये प्रशासनाने जाहीर केलेल्या आकड्यानुसार सोमवारी ८८१ बाधित आढळले. महिनाभरातील बाधितांची संख्या घटली असली, तरी ही तपासणीच्या तुलनेत जास्त रुग्ण आढळले आहेत. तसेच ३८ जणांना जीव गमवावा लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. पॉझिटिव्हिटीचा दर कमी येत नसल्याने प्रशासनापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
जिल्ह्यामध्ये रोज ६ हजारांवर कोरोना तपासण्या होत होत्या; मात्र रविवारी केवळ १ हजार ९२० इतक्या कमी तपासण्या झाल्या आहेत. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात ४० टक्के इतके सरासरी पॉझिटिव्हिटीचे परिणाम प्रमाण होते. तेच रविवारी वाढून जवळपास ४६ टक्क्यांवर जाऊन पोहोचले.
सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या सर्वात जास्त तपासण्या होतात. दैनंदिन दोन ते अडीच हजार तपासण्या होत असल्या, तरी रविवारी इथे केवळ ३७ तपासण्या झाल्या. त्यात एकही बाधित आढळून आलेला नाही. सातारा, फलटण या तालुक्यांमध्ये तपासणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर बाधित आढळत असल्याने या दोन तालुक्यांमधील पॉझिटिव्हिटीची संख्या प्रचंड मोठी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी सातारा तालुक्यात २४२, तर फलटण तालुक्यात २४० रुग्ण आढळले. कऱ्हाड, वाई, खंडाळा, माण, खटाव तालुक्यातील रुग्णसंख्या थोडी कमी झाल्याचे चित्र आहे. सातारा आणि कऱ्हाड तालुक्यात प्रत्येकी आठ मृत्यू झाले. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ३३२३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचे पाहून निष्काळजीपणा सुरू ठेवल्यास बाधितांची संख्या अचानकपणे वाढू शकते, हे लक्षात घेऊन जिल्हावासीयांनी सॅनिटायझर, मास्क यांचा वापर आणि सुरक्षित अंतर या गोष्टींचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हयात पहिला डोस घेण्याची एकूण संख्या ५ लाख ७० हजार ३०९ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख १३ हजार ८३४ जणांनी लस घेतल्याने जिल्हय़ात एकूण लस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ८४ हजार १४३ एवढी झाली असल्याचे डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत १४१६ नागरिकांना घरी सोडण्यात आले. जिल्हय़ात आता १ हजार ९९३ बेड रिक्त झाले आहेत. जिल्हय़ात कोविड हॉस्पिटल्स वाढवण्यात आली असून, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडही वाढवण्यात आले आहेत. जिल्हय़ात ६ हजार ४९८ बेड उपलब्ध आहेत.
कोट...
जिल्ह्यामध्ये रविवारी कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्या होत्या. त्यामुळे पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या कमी दिसत असली, तरी पॉझिटिव्हिटी जास्त आहे. बाधित लोकांची संख्या सलगपणे तीन-चार दिवस कमी आली, तर प्रमाण कमी होईल; परंतु नागरिकांनी अधिक दक्षता पाळणे गरजेचे आहे, तरच ही महामारी आपल्याला आटोक्यात आणता येईल.
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा