सातारा : ‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नेत्यांच्या नुरा कुस्त्या सुरू आहेत. ज्यांनी बँका बुडवल्या, त्यांनाच आमदार शशिकांत शिंदे पक्षात येण्याचे आमंत्रण देत आहेत. बँकेसाठी चाललेले राजकारण न समजायला जनता खुळी नाही,’ अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी केली आहे.
पवार यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या १५ ते २0 दिवसांपासून आमदार शिवेंद्रराजे यांना संघर्षाची भाषा, गळाभेटीची भाषा त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षात येण्याचे आमंत्रण आणि सातारा नगरपालिकेचे नेतृत्व करण्याचे जाहीर आवाहन केले जात आहे. मी सातत्याने ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांना भेटलो; परंतु त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेत असताना कधीही याबाबत भाष्य केलेले नाही. शिवेंद्रसिंहराजेंना राष्ट्रवादीमधील प्रवेश हा काय घरगुती निर्णय आहे का?
राष्ट्रवादी सत्तेत येणार नाही, हे लक्षात घेऊन शिवेंद्रसिंहराजे पक्ष सोडून गेले. भर पावसामध्ये झालेल्या जाहीर सभेत शरद पवार यांनी माझी चूक झाली ती दुरुस्त करा, असे सांगितले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जावलीतील जनतेने, ७६ हजार मतदारांनी राष्ट्रवादीला साथ दिली. आमदार शिंदे आता ७६ हजार मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करत आहेत. तो संभ्रम त्यांनी तत्काळ थांबवावा.