ऑक्टोबर महिन्यात १० वर्षांमध्ये कोयनेतून सोडले सहावेळा पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 01:02 PM2020-10-19T13:02:24+5:302020-10-19T13:04:02+5:30
Koyana Dam, sataranews, rain, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरणे भरतात. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी विसर्ग सुरू करावा लागतो.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरणे भरतात. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी विसर्ग सुरू करावा लागतो. पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाणी सोडले जाते. पण, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होत असेल तर ही बाब वेगळी ठरते. अशाचप्रकारे मागील १० वर्षांत ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे कोयनेच्या दरवाजातून सहावेळा पाणी सोडावे लागले आहे.
जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचा. कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली, कास या भागात पावसाळ्यात धुवाँधार असते. या भागातील पावसावरच कोयना धरणा धरण भरणार का नाही हे अवलंबून राहते. तसेच प्रमुख धरणे ही जिल्ह्याच्या पश्चिम भागातच आहेत. अपवाद वगळता दरवर्षी ही धरणे भरतात.
बहुतांशीवेळा ऑगस्ट अखेरपर्यंत धरणे भरुन पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करावा लागतो. तर सप्टेंबर महिन्यापासून पश्चिमेकडे पाऊस कमी होतो. मात्र, मागील काही वर्षांत ऑक्टोबरमध्येही जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ लागली. हा पाऊस पश्चिम भागातही होत असतो. त्यामुळे ऑक्टोबरमध्येही पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांतून विसर्ग करावा लागला आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे अनेक धरणांतून विसर्ग सुरू करावा लागलेला. तर यंदाही ऑक्टोबर महिन्यात सतत पाच दिवस चांगलाच पाऊस झाला. तर १३ आणि १४ ऑक्टोबरला अतिवृष्टी झाली. यामुळे कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडावे लागले. पायथा वीजगृह तसेच सहा दरवाजे वर उचलून कोयना नदीपात्रात पाणी सोडावे लागले.
कोयना धरणाचा विचार करता २०१० पासून आतापर्यंत सहावेळा अतिवृष्टीमुळे दरवाजातून पाणी सोडावे लागले आहे. यापूर्वी २०१० च्या ऑक्टोबरमध्ये तीनवेळेला दरवाजातून विसर्ग करावा लागलेला. तर २०१३ लाही तीनवेळा, २०१६ ला सहावेळा, २०१७ ला दोन आणि २०१९ मध्ये तब्बल सातवेळा ऑक्टोबरमध्ये कोयनेच्या दरवाजाातून पाणी सोडावे लागलेले. यावर्षीही अतिवृष्टीमुळे विसर्ग करावा लागला आहे.
कोयनेला आतापर्यंत ४४६७ मिलिमीटर पाऊस...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात यंदा गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मागीवर्षी कोयनेला आतापर्यंत ७३६६ मिलिमीटर पाऊस झालेला. तर यावर्षी १८ ऑक्टोबरपर्यंत फक्त ४४६७ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच नवजा येथेही पावसाचे प्रमाण यंदा कमी आहे.
गतवर्षी ८३९३ तर यंदा ५१७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत ५१९२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी ७३११ मिलिमीटर पाऊस महाबळेश्वरमध्ये पडला होता. यावर्षी पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.