प्रचाराला पदाधिकाऱ्यांची फौज
By admin | Published: October 9, 2014 09:32 PM2014-10-09T21:32:39+5:302014-10-09T23:02:00+5:30
आपापले भाग सांभाळणार : नेत्यांच्या खेळीमुळे लागलेल्या लॉटरीला आली जागण्याची वेळ
जगदीश कोष्टी - सातारा -ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती निवडीत सदस्यांनी नेत्यांना खिंडित पकडण्याचा प्रयत्न केला अन् त्यातून अनेकांना पदांची लॉटरीही लागली. या लॉटरीला जागण्याची वेळ आता आली असून, आपापले भाग सांभाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी प्रचाराला लागले आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी गेल्या महिन्यात निवडी झाल्या. त्यावेळी अनेकजण इच्छुक होते. त्यातील काहींनी दबावही आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बेरजेचे राजकारण केले. त्यातून आपल्या मतदारसंघासाठी अडचणीचा ठरणार नाही, याचा विचार करून फलटणला माणिकराव सोनवलकर यांच्या रूपाने जिल्हा परिषद अध्यक्ष तर साताऱ्याला रवी साळुंखे यांच्या रूपाने उपाध्यक्षपद मिळाले.
त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील आघाडीत बिघाडी झाली अन् सभापती निवडीत नाराज झालेल्या विधानसभा मतदारसंघांना प्रतिनिधीत्व देत माण-खटावला झुकते माप दिले. हे करत असताना जिल्हा परिषद सदस्य जेवढे आक्रमक होते, त्याहीपेक्षा नेत्यांच्या डोक्यात वेगळीच गणितं होती. त्यामुळे सभापतिपदाची लॉटरी लागली आहे.
नेत्यांच्या आशीर्वादामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतिपद मिळाल्याने या लॉटरीला जागण्याची वेळ आली आहे. आपल्याला वरदहस्त असलेला नेता आमदार झाला तर आपला जिल्हा परिषद गट तसेच परिसराचा विकास करण्यासाठी निधी आणणे सोपे जाणार आहे. तसेच आता त्यांचा प्रचार केला तर भविष्यात हक्काने कामे करुन घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आपापल्या भागात प्रचार करण्यामध्ये हे पदाधिकारी गुंतले आहेत. सभापतिपदाच्या निवडी दि. २ आॅक्टोबरला झाल्या. बहुतेकजण तेव्हापासून जिल्हा परिषदेत आलेलेच नाहीत. आचारसंहिता लागू असल्याने जिल्हा परिषदेत फारशी कामेही करता येत नाहीत. तसेच अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात असल्याने ही मंडळी आता निवडणूक झाल्यानंतरच येणार आहेत.
कक्षांना कड्या
सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांच्या सभापतींच्या कक्षांना कड्या लावलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना सेवक मंडळी, ‘साहेब आज आले नाहीत,’ असे सांगत आहेत.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारीची संधी मिळालेले सहाही जण प्रचाराला लागले आहोत. हे करत असताना आपापले गट पाहून सामाजिक परिस्थितीनुसार प्रचार करणार आहे.
- माणिकराव सोनवलकर,
अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा.
विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी ठराविक असा भाग वाटून घेतला नसून, जेथे गरज असेल त्या ठिकाणी प्रचाराला जात आहे.
- रवी साळुंखे,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद