बामणोली : सध्या अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असतात; परंतु सर्वांनाच शासकीय कामाची अपेक्षा असते. त्या विभागाला शिव्या देण्याशिवाय कोणीही स्वतः मात्र काहीही योगदान देत नाही; परंतु याला मात्र अपवाद ठरले आहेत, उंबरी चोरगे येथील ७२ वर्षीय वृद्ध भिकू गणू सूतार. शासनस्तरावरून मदतीची अपेक्षा न ठेवता भिकू सुतार यांनी मात्र दिवसभर टिकाव, खोरे घेऊन स्वतः एकट्याने मुरुम माती टाकून हे खड्डे मुजवून तरुण वर्गासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.अंधारी ते उंबरीवाडी या कच्च्या असणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. येथून प्रवास करणाऱ्या उंबरीवाडी, उंबरी चोरगे, कारगाव, अंबावडे या चार गावांच्या लोकांना आपली वाहने चालविणे अवघड बनले होते. बामणोली-तापोळा परिसरात अनेक गावे डोंगर कपारीत वसलेली आहेत. अनेक गावांची वाडी-वस्ती तसेच मुरे अशी विभागनी झालेली आहे.
आजही अनेक मुऱ्यांसाठी कच्चे रस्तेही उपलब्ध नाहीत. येथील लोकांना आजही वादळी वारे, पाऊस , थंडी अशा वातावरणात आजारी वृद्ध व्यक्ती तसेच गरोदर स्त्रियांना डोली तसेच कावडीतून उचलून घेऊन पक्का रस्ता गाठावा लागतो. शिवाय ज्या रस्त्यांवर डांबर पडलेले आहे. त्यांना आठ-दहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे या रस्त्यांची आजची अवस्थाही खूपच दयनीय अशी आहे.
या रस्त्यांची दुरुस्ती होणे खूप गरजेचे आहे. शिवाय जे कच्चे रस्ते आहेत, त्यांच्या डांबरीकरणाची आवश्यकता आहे. उंबरी चोरगे या गावच्या भिकू गणू सुतार यांनी त्यांच्या गावचा रस्ता स्वतः कष्ट करून व मेहनत घेऊन खड्डे मुजविले; परंतु इतर गावच्या लोकांनी ही याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
आमच्या अंधारी ते उंबरी वाडी रस्त्यावर खूप खड्डे पडले होते. या रस्त्यावरून दुचाकी चालविता येत नव्हती. मी माझ्या नातवाच्या गाडीवरून जाताना खड्ड्यात गाडी आपटून कमरेत चमक भरल. मी चार दिवस औषधे घेऊन घरीच बसून राहिलो. शासनाकडून या रस्त्यासाठी डांबरीकरण होणार आहे, असे सर्वजण बोलतात; परंतु तोपर्यंत या खड्ड्यातून कसा लोक प्रवास करणार म्हणून मी स्वत: दोन दिवस येथील खड्डे मुरुम मातीने मुजविले आहेत.-भिकू गणू सुतार,उंबरी चोरगे, ता. जावली
मी उंबरी चोरगे या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मला शाळेपर्यंत माझी स्कूटर घेऊन रस्त्यावरील खड्ड्यामुळे जाता येत नव्हते. मी माझी स्कूटर रस्त्यावर लावून शाळेत जायचो; परंतु एका वयोवृद्ध माणसाने रस्त्यावरील खड्डे मुजविले तेव्हा आम्हा सर्वांना येथून प्रवास करणे सोयीचे झाले आहे.-विजय भोसले,शिक्षक, उंबरी चोरगे