खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटाच्या सुरुवातीला असणाऱ्या जुन्या टोलनाक्याच्या कठड्यामुळे वाहतुकीला अडचणी येत होत्या. या कठड्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले होते. हा धोकादायक कठडा महामार्ग प्रशासनाने हटविला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे होण्यास मदत होईल. खंडाळानजीक महामार्गावर चौपदरीकरणाचा व बोगदा बांधकामाचा टोलनाका आकारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा टोलनाका बंद करण्यात आला आहे. मात्र, टोलनाक्याचे शेड व दगडी कठडा तसाच होता. भरधाव वेगाने येणारी वाहने अंदाज न आल्याने अनेकदा कठड्याला धडकून अपघात होत होते. याठिकाणचा कठड्याचा अडथळा दूर करावा, यासाठी ग्रामस्थ, प्रवाशांनी मागणी केली होती. कठड्याचा अडसर दूर करण्याबाबत खंडाळा पोलिसांनीही हायवे प्रशासनाकडे प्रस्ताव दिले होते. सध्या सहापदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, हा टोलनाक्याचा अडसर हटविण्यात आला आहे. त्यामुळे विनाअडथळा वाहतुकीचा मार्ग सुकर झाला आहे. वाहनचालकांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
जुन्या टोलनाक्याचा कठडा हटविला
By admin | Published: July 05, 2015 1:10 AM