अवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:52 PM2019-11-14T12:52:55+5:302019-11-14T12:56:24+5:30

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता कोलमडला असून, याचा फटका जवळपास दीड लाखजणांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. तर पंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी हे माण, फलटण आणि खटाव या तालुक्यांतीलच आहेत.

One and a half lakh farmers suffer due to famine | अवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळा

अवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळा

Next
ठळक मुद्देअवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळापंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित

नितीन काळेल

सातारा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता कोलमडला असून, याचा फटका जवळपास दीड लाखजणांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. तर पंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी हे माण, फलटण आणि खटाव या तालुक्यांतीलच आहेत.

जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती होती. जूनपासून आॅक्टोबरपर्यंत दुष्काळी तालुक्यात एकही दमदार पाऊस झाला नव्हता. तर पश्चिमेकडेही पर्जन्यमान कमी राहिलेले. तसेच गेल्यावर्षी दीडशेहून अधिक गावे आणि एक हजारच्या वर वाड्यावस्त्यांवरील लोकांना पाणी पुरविण्यासाठी टँकर धुरळा उडवत होते.

गेल्यावर्षी दुष्काळी तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नव्हता. तसेच इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळाचा चांगलाच फटका बसलेला. मात्र, यावर्षी ही स्थिती बदलली. सुकाऐवजी सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ निर्माण झाल्याची भावना शेतकºयांची झालीय. त्यामुळे जिल्ह्यातीलच शेतकरी कोलमडून पडलाय.

आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाचा विविध पिके आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १४५० हून अधिक गावांतील शेतकरी अवकाळीच्या फेऱ्यात सापडलेत. शासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पीक आणि फळबागा नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत.

जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांतील मिळून ५६ हजार ९४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर बाधित शेतकऱ्यांचा आकडा हा १ लाख ४६ हजार ५९२ आहे. अवकाळी पावसात नुकसान झालेली पिके आणि फळबागांचे पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असलेतरी अजूनही काही शेतकरी हे नुकसानीचे अर्ज भरून देत आहेत.

पूर्ण झालेल्या पंचनाम्यानुसार सर्वाधिक नुकसानग्रस्त क्षेत्र हे फलटण तालुक्यात १५ हजार ५६६ हेक्टर असल्याचे दिसून आले आहे. तर त्यानंतर माण तालुक्यात १० हजार ४२८, खटावमध्ये १० हजार १३० हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसलाय. तसेच सातारा तालुक्यात ४ हजार ८८८, खंडाळा ४ हजार ६२३, कोरेगाव ३ हजार ६३५, पाटण २ हजार ९९९, कऱ्हाड १ हजार ४४४, महाबळेश्वर १ हजार ३५३, वाई १ हजार २८८ आणि जावळी तालुक्यातील बाधित क्षेत्र हे ५८५ हेक्टर इतके राहिले आहे. नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण केले आहेत.

जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पीक हे सोयाबीनचे आहे. त्या खालोखाल भात, भुईमूग, ज्वारी, घेवडा आदीचे आहे. तसेच माण, फलटण, खटाव आणि कोरेगावमधील द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. खरीपबरोबरच रब्बी हंगामात पेरणी केलेल्या ज्वारीच्यालाही फटका बसला असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे.

बाधित शेतकरी संख्या अशी...

जिल्ह्यातील अवकाळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक फलटण तालुक्यात ३८ हजार ४८० इतकी आहे. त्यानंतर खटाव २२ हजार ५९, माण तालुक्यात १८ हजार ४३९, सातारा तालुका १७ हजार ९४०, खंडाळा १३ हजार ९३०, पाटण १२ हजार ३३२, कऱ्हाड ६ हजार ४६१, महाबळेश्वर ५ हजार ६९, जावळी तालुका ४ हजार ८४२, कोरेगाव ३ हजार ५९३ आणि वाई ३ हजार ४४७ असा आहे.

Web Title: One and a half lakh farmers suffer due to famine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.