सातारा : गेल्या पाच दिवसांपासून अंशत: सुरू असलेले लॉकडाऊन शनिवारपासून सोमवार सकाळी आठपर्यंत पूर्णत: राहणार आहे. त्यासाठी सातारा शहरात चौका-चाैकात नाकाबंदी करण्यात आली. कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात दीड हजारांहून अधिक पोलिसांची कुमक वाढविण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्वत: फिल्डवर उतरून नागरिकांना लाॅकडाऊनचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. ५ एप्रिल २०२१ पासून लागू केलेल्या या निर्बंर्धांमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे. यात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. याशिवाय, शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या दरम्यान अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यास बंदी आहे. याव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊनसह संचारबंदीही लागू आहे. त्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवरही हा बंदोबस्त असून, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर साथ प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली जात आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शनिवारी सकाळी शहरात फिरून नागरिकांना लाॅकडाऊनचे नियम पाठावेत, असे आवाहन केले. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. दिवसभर रस्त्यावर शुकशुकाट होता. रस्त्यावर विनाकारण फेरफटका मारणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
चाैकट : गृहराज्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा..
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी शनिवारी दुपारी पोलिसांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते.
यावेळी गृहराज्यमंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील एकूण बाधित किती आहेत, सध्या किती उपचार घेत आहेत, बरे झालेले रुग्ण किती, विनामास्क फिरणार्या नागरिकांवर केलेल्या कारवाईची माहिती, विनाकारण बाहेर फिरणार्या वाहनचालकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती घेतली. त्यानंतर लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याबाबत व नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्ती, आस्थापना यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत त्यांनी पोलीस विभागाला सक्त सूचना केल्या.