वाठार स्टेशन/आदर्की : लोणंद-सातारा रस्त्यावर निष्णाई पेट्रोल पंपाजवळ लक्झरी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी सहा वाजता झाला. सर्व प्रवाशी उत्तर भारतात देवदर्शनाला निघाले होते. अपघातातील जखमींच्या मदतीसाठी स्थानिक लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे सध्या लुप्त होत चाललेल्या माणसुकीचं दर्शन घडलं. कोल्हापूर, इस्लामपूर, मनेराजुरी, बोरगाव, उंब्रज, कोरेगाव आदी परिसरातील चाळीस जण लक्झरी बसने २८ दिवसांसाठी उत्तर भारतात देवदर्शनासाठी निघाले होते. कोल्हापूरहून निघालेली बस वाठार स्टेशन येथील पेट्रोल पंपाजवळ येताच भरधाव ट्रकची आणि लक्झरी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, लक्झरी बसचे केबिन ट्रकच्या केबिनमध्ये अडकले. ट्रक चालक विजय बाबूराव वैरागर (रा.केडगाव चौफुला) स्टेरिंगच्या रॉड आणि बोनेटमध्ये अडकला. त्याच्या उजव्या पायाला गंभीर जखम झाली. पोलीस आणि ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त करत जेसीपी आणि ट्रॅक्टरच्याद्वारे दोन्ही वाहने वेगळी करून त्याला बाहेर काढले. या अपघातात सागर कमाने गंभीर जखमी झाला. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर काढण्यात आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ट्रक चालकासह अन्य दहा प्रवाशांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये शांताबाई पांडुरंग घाडगे (रा.बोरगाव), वैजंता तानाजी पवार (रा.मनेराजुरी), शोभाताई मनोहर कुंभार ( रा. मळणगाव), आक्काताई सदाशिव कुंभार ( रा. मळणगाव), आशिष कुमार केदार मल्लाप्पा (रा.मुळशी), प्रभावती बाबुराव कुंभार ( रा.मळणगाव), तानाजी दत्तू पवार (रा.मनेराजुरी), रजनीकांत कैलास कांबळे (लक्झरी चालक रा.कोल्हापूर), अनिल किसन शिंदे, वैजंता जगन्नाथ जाधव (रा.उंब्रज) या प्रवाशांचा समावेश आहे.अपघाताची माहिती समजतात वाठार पोलीस स्टेशनचे सपोनि मारुती खेडकर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने सातारा येथे नेण्यात आले. अपघातस्थळी जमलेल्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी व इतर ट्रक चालकांनी मदतकार्य केले. खरोखरच माणुसकीचे दर्शन घडल्याचे पाहायला मिळाले. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पर्याय म्हणून माळरानातून बैलगाडीच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली.
देवदर्शनला जाताना लक्झरी बसला अपघात; एकाचा मृत्यू, दहा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 7:34 PM