सातारा येथे कांद्याला मिळाला क्विंटलला १८०० रुपये दर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:35 AM2021-03-15T04:35:45+5:302021-03-15T04:35:45+5:30
सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली, तरी दरात मात्र सतत चढ-उतार सुरू आहे. रविवारी ...
सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली, तरी दरात मात्र सतत चढ-उतार सुरू आहे. रविवारी क्विंटलला ३०० रुपयांपासून १,८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर वांग्यासह आले अन् लसणाचे दर मात्र कमी झाले आहेत.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते.
सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ५११ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली तर कांद्याची ४४७ क्विंटलची आवक झाली. या रविवारी कांद्याची आवक चांगली झाली. बाजार समितीत वांग्याला १० किलोला अवघा ७० ते १२० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ५० ते ७० रुपये, कोबी ३० ते ४० रुपये, फ्लाॅवरला ६० ते १०० रुपये, दोडका ३०० ते ३५० रुपये आणि कारल्याला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. तसेच इतर पालेभाज्यांच्या दरातही अपेक्षित वाढ झालेली नाही.
खाद्यतेल दरात पुन्हा वाढ
खाद्यतेलाचे दर तेजीतच आहेत. आठवड्यात तेलाच्या दरात वाढ झाली. डब्यामागे ३०० तर एक लीटरच्या पाऊचमागे सरासरी १० रुपयांपर्यंत वाढ झाली. सूर्यफूल तेल डबा २,५०० ते २,६००, सोयाबीन २,१०० ते २,२३० तर शेंगदाणा तेल डबा २,५०० ते २,७०० पर्यंत पोहोचला. शेंगदाणा तेल पाऊच १७० ते १८० रुपयांपर्यंत मिळत आहे.
द्राक्षाची आवक वाढली
साताऱ्यात सध्या कलिंगड आणि द्राक्षाची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात फार वाढ झालेली नाही. कलिंगड १० रुपयांपासून तर द्राक्षे ५० रुपये किलोने मिळत आहेत.
गवारला दर
बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर कमी असून, गवारचा दर मात्र टिकून आहे. गवारला १० किलोला ५०० ते ६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला तर ढबू, वाटाणा, भेंडी, पावटा, वालघेवडा यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. आल्याला क्विंटलला १,५०० तर लसणाला ५ हजारांपर्यंत भाव मिळाला.
कोट :
गेल्या काही आठवड्यांपासून पालेभाज्यांचा दर कमी आहे. मात्र, गवार, भेंडीचा दर टिकून आहे. कोबीचा दर अजूनही कमीच आहे. दर आटोक्यात असल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
- कृष्णत पाटील, ग्राहक
कोरोनामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पाश्चात्य देशांनी निर्यात कर वाढवला. त्यामुळे आपल्याकडे खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. यापुढे तेलाचे दर आणखी वाढू शकतात.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात चढ-उतार सुरू आहे. त्यातच दर दोन हजारांच्या खाली आल्याने कांदा विकावा की नको, अशी मन:स्थिती आहे. तर वांगी, टोमॅटोचे दर कमी झाले आहेत.
- सर्जेराव पवार, शेतकरी