कऱ्हाड : विक्रेत्यांची सोय व्हावी आणि ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व भाजीपाला उपलब्ध व्हावा, या उद्देशातून भाजी मार्केटची उभारणी होते; मात्र येथील छत्रपती संभाजी भाजी मार्केटची तऱ्हाच न्यारी आहे. उभारणीपासून आजतागायत याठिकाणी पूर्ण क्षमतेने मंडई भरलेलीच नाही. कांदा, बटाटा वगळता या विस्तीर्ण मार्केटमध्ये कसलीच भाजी मिळत नाही, हे दुर्दैव.
शहरातील भाजी मंडईचे विकेंद्रीकरण व्हावे, या हेतूने सुमारे तीस वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी भाजी मार्केटची उभारणी करण्यात आली; मात्र सुरुवातीपासूनच हे मार्केट दुर्लक्षित राहिले आहे. विक्रेत्यांसह ग्राहकांनीही पाठ फिरविल्याने व्यावसायिक गाळ्यांतील दैनंदिन कामाव्यतिरिक्त मार्केटमध्ये पूर्णपणे शुकशुकाट जाणवतो. मार्केटकडे भाजीपाला विक्रेते फिरकतच नाहीत. कांदा, बटाट्याचे दोन-चार व्यापारी याठिकाणी बाजार मांडून बसतात. त्यामुळे ग्राहकही या मार्केटला वळसा घालून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईकडे मार्गस्थ होतात. छत्रपती शिवाजी भाजी मंडई ही शहरातील मुख्य मंडई आहे. याठिकाणी पालिकेने मोठी इमारत उभारली आहे. व्यावसायिक गाळेही तयार केले असून बाजारकट्टे असल्यामुळे विक्रेत्यांना व ग्राहकांना हे सोयीचे वाटते.
छत्रपती संभाजी भाजी मार्केटमध्ये मंडई सुरू करण्याचा प्रयत्न पालिकेने वारंवार केला. त्यासाठी वेळोवेळी इमारतीची डागडुजीही केली; मात्र तरीही ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशीच येथील परिस्थिती आहे. सध्याही कांदा, बटाटा वगळता येथे कसलाच भाजीपाला विकला जात नाही. याउलट ठिकठिकाणच्या रस्त्यावर बसून विक्रेते भाजीपाला विकतात. ग्राहकही रस्त्यावरचा हा भाजीपाला आवडीने खरेदी करतात; पण छत्रपती संभाजी मार्केटकडे सगळेच पाठ फिरवतात.
- चौकट
दोन कोटीत होणार वरचा मजला
शासनाने पालिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठीच्या विशेष अनुदानातून दोन कोटींचा निधी छत्रपती संभाजी भाजी मार्केटसाठी नुकताच मंजूर केला आहे. हा निधी लवकरच पालिकेस वर्ग होणार असून त्यातून मार्केटच्या वरच्या मजल्याचे बांधकाम होणार आहे.
- चौकट
मिळू शकतात हे ग्राहक!
१) भेदा चौक परिसर
२) बनपूरकर कॉलनी
३) सह्याद्री गृहनिर्माण सोसायटी
४) मोहिते हॉस्पिटल परिसर
५) शास्त्रीनगर-कोल्हापूर नाका
६) नवीन पोलीस वसाहत
७) कार्वे नाका परिसर
८) त्रिमूर्ती, खराडे, दौलत कॉलनी
९) रेव्हिन्यू कॉलनी, शिक्षक कॉलनी
१०) बैलबाजार-गोळेश्वर रोड
- चौकट
मार्केटचा लेखाजोखा
१९८९ साली उभारणी
६० पेक्षा जास्त गाळे
४ मोठे शेड
१ लहान शेड
८ मोठे बाजारकट्टे
२ अत्याधुनिक स्वच्छतागृह
- चौकट
मार्केट ओस; रस्त्यावर बाजार!
१) कर्मवीर चौक ते सिटी पोस्ट रस्ता
२) बापूजी साळुंखे पुतळा ते प्रभात टॉकीज
३) प्रभात टॉकीज ते आंबेडकर चौक
४) महेश कोल्ड्रिंक्स ते मंडई रस्ता
५) कन्या शाळा ते मंडई अंतर्गत रस्ता
फोटो : ११केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाडमधील छत्रपती संभाजी भाजी मार्केटमध्ये मंडई सुरू करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला; मात्र अद्यापही या मार्केटमध्ये नेहमीच शुकशुकाट जाणवतो.