सातारा : ‘जिहे-कठापूर योजनेला १ हजार ८५ कोटींच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली म्हणजे निधी आला, असे होत नाही. पालकमंत्र्यांनी गेल्या तीन वर्षांत केवळ ७० हजार रुपयांचा निधी या योजनेसाठी आणला आहे,’ अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.येथील विश्रामगृहावर मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, ‘पालकमंत्री विजय शिवतारे हे २०१५ रोजी जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हा त्यांनी एक वर्षात जिहे-कठापूर योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ते प्रत्येक वर्षी तसे पुन्हा आश्वासन देत आहेत. तसेच जिहे-कठापूर योजनेसाठी १ हजार ८५ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगत आहेत. वास्तविक, तेवढ्या रकमेची तरतूद झालेली नाही, असे असताना व योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने सुधारित मान्यता मिळविण्याशिवाय पाऊल उचलले गेले नाही.पत्रकार परिषदेला माढा लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, दादासाहेब काळे आदी मान्यवर उपस्थित होत.२०० कोटी पुरेसेपालकमंत्र्यांनी घोषणा करण्यापेक्षा वास्तववादी काम करावे. एका वर्षात पाणी येऊ शकते, मला माहीत आहे. त्यासाठी केवळ २०० कोटी रुपये पुरेसे होतील. एवढ्या रकमेतून या योजनेतून शिवारात पाणी खेळेल. त्यामुळे आघाडी शासनाने केलेल्या तरतुदींवर पालकमंत्री आपलं दुकान चालवतायत, ते त्यांनी बंद करावे, असा सल्लाही आमदार गोरे यांनी यावेळी दिला.
पालकमंत्र्यांनी आणले केवळ ७० हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:21 AM