सातारा : ‘आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नव्या दमाच्या लोकांना काँग्रेस संधी देईल. महाराष्ट्रात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला असला तरीदेखील साताऱ्यात चांगले वातावरण तयार करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत,’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
येथील काँग्रेस कमिटीत नूतन कार्यकारिणी सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अॅड. विजयराव कणसे, हिंदुराव पाटील, अजित पाटील-चिखलीकर, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश फाळके, जयवंतराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील-उंडाळकर, रजनी पवार, मनोजकुमार तपासे, प्रतापराव देशमुख, बाबासाहेब कदम, भीमराव पाटील, नंदाभाऊ जाधव, जयवंतराव केंजळे आदी उपस्थित होते.
आ. चव्हाण पुढे म्हणाले, मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत आंदोलन सुरू आहे. काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी हे कायदे आणले असून, त्याविरोधात लवकरच सातारा जिल्ह्यात शेतीविषयक कायद्यांसाठी शिबिरे घेण्यात येणार आहे. दरम्यान, आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तालुका आणि जिल्हा परिषद गटनिहाय बैठका सुरू करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गावागावांत भेटीगाठी वाढवा आता अख्खा जिल्हा ढवळून काढायचा आहे. लोकांपर्यंत पोहोचा म्हणजे मनपरिवर्तन होईल आणि काँग्रेसला सुगीचे दिवस येतील, असेही ते म्हणाले.
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, सातारा जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी नवीन पदाधिकारी नियुक्तीमुळे काँग्रेसला चांगले दिवस आले आहेत. जुन्या आणि नवीन अनेकांना या कार्यकारिणीवर संधी देण्यात आली असून, त्याचा काँग्रेस पक्षासाठी नक्कीच फायदा होईल. आगामी सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागूयात आणि लढा जिंकूयात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
चौकट..
१०० जणांची टीम सज्ज करणार
सातारा काँग्रेस कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. आता ४९ जणांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, काही दिवसांत तालुकाध्यक्ष, सेवादल अशा नियुक्त्यांकडून १०० जणांची टीम तयार करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला पुन्हा काँग्रेसला अच्छे दिन येतील. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांत जास्त यश मिळवले जाईल, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.
चौकट..
गारपीटग्रस्तांना सरकार मदत करेल
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. पक्षांच्या नेत्यांशी बोलून मंत्रिमंडळ बैठकीत सरकारला याबाबत निर्णय घेण्यासाठी काँग्रेस आग्रह धरेल, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.
फोटो ओळ : सातारा येथील काँग्रेस कमिटीमध्ये शुक्रवारी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.