पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात गुरुवार (दि. १८) रोजी गारपीट आणि वाऱ्यासह अवकाळीने थैमान घातले. या आपत्तीने परिसरातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आमदार महेश शिंदे यांनी महसूल, कृषी विभागाला नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. शिंदे यांच्या सूचनेनुसार पुसेगाव गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
अचानक आलेल्या या अवकाळीने काढणीस आलेली पिके खराब झाली. या नुकसानाचे स्वरूप हे नेहमीपेक्षा मोठे असून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाल्याची माहिती सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव यांनी दिली. ज्वारी, गहू, हरभरा आणि विशेषकरून कांदा या पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.
या वेळी बुधचे सरपंच अभय राजेघाटगे, मोळचे वैभव आवळे, ललगूणचे सरपंच जयवंत गोसावी, शिवाजी शेडगे, हणमंत शिंदे, सागर मदने, जालिंदर वाघ, कुंडलिक भंडलकर, अजय वाघ उपस्थित होते.
खरिपाच्या संकटातून सावरून शेतकऱ्यांनी उसनवारी करीत रब्बी हंगामातील पिके घेतली होती. मात्र, या भागातील काही ठिकाणी रब्बीची पिके काढणीच्या अवस्थेत असतानाच अवकाळी पावसाने थैमान घालून होत्याचे नव्हते केले आहे. चांगला बाजारभाव मिळत असलेली कांद्याची पिके काही ठिकाणी पाण्याखाली बुडाल्याचे चित्र असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांची ज्वारी उपटून शेतात पसरलेली आहे. काटणीपूर्वीच पावसाने कडब्याबरोबरच ज्वारीही भिजली असून उभ्या ताटावरील कणसे काळी पडण्याचा धोका आहे. काढणीस आलेल्या गहू, हरभरा पिकाचेही भिजून मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळीने येथील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम वाया गेला असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.
चौकट
खटाव तालुक्यातील मोळ डिस्कळ भागात गुरुवारी सुमारे दोन तास प्रचंड गारपीट झाली. शेतीतील उभ्या असलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. महसूल तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तातडीने या भागात जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे होते. मात्र शिवजयंतीची सुटी असल्याने एकही अधिकारी या भागात पाहणीसाठी फिरकला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
फोटो ओळी : १९पुसेगाव-मोळ
मोळ येथील जगन्नाथ घाडगे यांच्या ज्वारी पिकाच्या नुकसानीचे देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, बुधचे सरपंच अभय राजेघाटगे, वैभव आवळे, जयवंत गोसावी, शिवाजी शेडगे व हणमंत शिंदे, सागर मदने, जालिंदर वाघ, कुंडलिक भंडलकर, अजय वाघ यांनी पाहणी केली. (छाया : केशव जाधव)