पंचेचाळीस वर्षांपासून पाचुंद ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:34 AM2021-01-18T04:34:58+5:302021-01-18T04:34:58+5:30
शामगाव : पाचुंद, ता. कऱ्हाड येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून बिनविरोधची परंपरा जपली आहे. यंदाही गावाने एकजूट दाखवीत ही परंपरा ...
शामगाव : पाचुंद, ता. कऱ्हाड येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून बिनविरोधची परंपरा जपली आहे. यंदाही गावाने एकजूट दाखवीत ही परंपरा कायम राखल्यामुळे गावात राजकीय कलह आणि गटतटाला जागाच उरली नाही.
कऱ्हाड तालुक्यातील पाचुंद हे घाटमाथ्यावरील दुष्काळी, तसेच डोंगरदरीत वसलेले गाव आहे. इंग्रजांनाही कित्येक वर्षे या गावाचा ठावठिकाणा लागला नव्हता, असे सांगितले जाते. सध्या येथील लोकसंख्या साडेचारशे ते पाचशे आहे, तर मतदान ३२५ आहे. ग्रामस्थांचे उदरनिवार्हाचे साधन शेती आहे. येथील शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. तरीही ग्रामस्थ एकीने राहतात. पूर्वीपासून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा येथे पगडा आहे. येथील ग्रामपंचायतीची स्थापना १९७५ साली झाली. त्यापूर्वी कामथी-पाचुंद या दोन गावांसाठी एक ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायत स्थापनेपासून पी. डी. पाटील यांचे नेतृत्व ग्रामस्थांनी स्वीकारले. सध्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे.
आजपर्यंत निवडणूक बिनविरोध करीत असताना इतर मागास प्रवर्ग गावात नसल्यामुळे सात सदस्य असताना दोन जागा रिक्त ठेवाव्या लागत आहेत. गत पंचवार्षिकमध्ये सरपंचपद आरक्षित होते. मात्र, गावात मागास प्रवर्ग नसल्यामुळे ते पद रिक्त ठेवून उपसरपंचांनी कारभार सांभाळला. ग्रामपंचायत स्थापनेपासून बाजीराव जाधव, तुकाराम जाधव, सिदू जाधव, युवराज गुरव, प्रभाकर पोळ, सुजाता रमेश जाधव, महेश जाधव हे बिनविरोध सरपंच झाले.
यंदाही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून ग्रामस्थांनी गावाची परंपरा अबाधित ठेवली आहे. अरुण जाधव, वनिता जाधव, नीता जाधव, कल्पना जाधव, अधिक जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
- चौकट
गत पंचेचाळीस वर्षांपासून आमच्या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली नाही. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. बिनविरोधमुळे आमच्या व शासकीय पैशांची बचत होत आहे. गावातील विकासाला गती मिळत आहे. खेळीमेळीचे वातावरण राहत आहे.
- भूषण जाधव
ग्रामस्थ, पाचुंद