कऱ्हाड तालुक्यातील विंग येथील वृद्धा काही दिवसांपूर्वी घरामध्ये पडल्यामुळे जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्या वृद्धेला आराम मिळावा, यासाठी त्यांच्या मुलीने त्यांना आपल्यासोबत खंडाळ्याला नेले. लोणंद येथील एका खासगी रुग्णालयात वृद्धेवर उपचार करण्यात येणार होते. मात्र, त्या ठिकाणी वृद्धेच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी वृद्धेची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी कोरोना रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, प्रवासादरम्यान २१ मार्च रोजी रात्री वाटेतच त्या वृद्धेचा मृत्यू झाला.
दरम्यान, नातेवाइकांनी याबाबत कोणाला काहीच सांगितले नाही. २२ मार्च रोजी सकाळी विंग येथे विधिवत अंत्यसंस्कार केले. मात्र, आरोग्य विभागाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर २४ मार्च रोजी कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावात शिबिर घेऊन संबंधित वृद्धेच्या नातेवाइकांसह अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या चाळीस जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्या वेळी एका नऊ वर्षांच्या मुलीसह पाच जण बाधित आढळले. तसेच गावात अन्य चार बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे सोमवारपर्यंत गावातील बाधितांची संख्या नऊ झाली असून प्रशासनाकडून बाधितांच्या संपर्कातील नातेवाइकांची तपासणी करण्यात येत आहे.
- चौकट
एक रुग्णालयात; आठ जण घरीच
बाधित आढळलेल्यांपैकी एका रुग्णावर मिरज येथे उपचार सुरू आहेत, तर इतर आठ रुग्णांना होम आयसोलेट करून घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. बाधितांच्या निकट सहवासातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यावर सध्या आरोग्य विभागाने भर दिला आहे.