शिंगणवाडी गावात जिल्हा परिषद सदस्य राजेश पवार यांनी करिष्मा करून दाखवत सत्तापरिवर्तन करीत येथे पाटणकरांचे स्वीय सहाय्यक शंकर पवार यांची सरपंचपदी तर अरुणा पवार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. केळोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणपत मोरेंनी गनिमी कावा करीत सत्ता परिवर्तन घडविले आहे. येथे काशिनाथ मोरे यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी काशिबाई बाळू लोहार यांची बिनविरोध निवड झाली. वाघजाईवाडी गावाने ग्रामपंचायत बिनविरोध करीत सत्ता अबाधित ठेवली आहे. येथे माजी सरपंच अशोकराव पवार यांनी विरोधकांचे पानिपत करीत अडीच अडीच वर्षांच्या फॉर्मुल्याला केराची टोपली दाखवत सत्ता अबाधित ठेवली आहे. येथे माजी उपसरपंच उद्योगपती रामचंद्र मराठे यांच्या पत्नी सविता मराठे यांची सरपंचपदी तर अशोक पवार यांना उपसरपंचपदी पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे.
कोचरेवाडी ग्रामपंचायतीत बबन मोहिते व बापूराव मोहितेंनी सत्ता अबाधित ठेवत ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली होती. येथे सरपंचपदी दगडू कोंडिबा मोहिते यांची तर उपसरपंच म्हणून नंदा विलास मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विरेवाडी ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून नर्मदा शिवाजी जाधव यांची तर उपसरपंचपदी प्रदीप बापूराव जाधव यांची वर्णी लागली आहे. चव्हाणवाडी ग्रामपंचायतीत देसाई गटाने सत्ता अबाधित ठेवली आहे. खोणोली देसाई गटाच्याच ताब्यात असून येथे सरपंचपद आरक्षित असल्याने येथे उपसरपंचपदी दिलीप तोडकर यांची वर्णी लागली आहे. पाठवडेत सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झोरे यांची तर उपसरपंचपदी देसाई गटाच्या लता तोरस्कर यांची निवड करण्यात आली आहे.
- चौकट
दोन्ही गटांची ताकद पणाला
चाफळ विभागात आठ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या. सुरुवातीला यातील वाघजाईवाडी व विरेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध होत पाटणकर गटाच्या ताब्यात गेल्या होत्या. तर उर्वरित सहा ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली ताकद पणाला लावली होती. जिल्हा परिषद सदस्य राजेश पवार यांनी गटाला ताकद देत चाफळ गण अबाधित ठेवला आहे. पाठवडेत सरपंच पद पाटणकर गटाकडे आल्याने सद्यस्थितीत पाटणकर गटाकडे सहा ग्रामपंचायती व देसाई गटाकडे चव्हाणवाडी व खोणोली या दोन ग्रामपंचायतींची सत्ता आहे.
फोटो : १३केआरडी०२
कॅप्शन : केळोली, ता. पाटण येथे सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.